यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२ हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळवणारे चार संघ निश्चित झाले आहेत. शनिवारी (२१ मे) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर पहिल्या चार मध्ये सहभागी झाला. मुंबईने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने ७ विकेट्सच्या नुकसानावर १५९ धावा केल्या, प्रत्युत्तरात मुंबईने हे लक्ष्य १९.१ षटकात आणि ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. आपण या लेखात दिल्लीच्या पराभवाची पाच प्रमुख कारणे पाहणार आहोत.
वरच्या फळीतील फलंदाज अपयशी
दिल्ली कॅपिटल्सला डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ संपूर्ण हंगामात चांगली सुरुवात देत आले आहेत, पण मुंबई इंडियन्सविरुद्ध ही सलामीवीर जोडी अपयशी ठरली. वॉर्नरने ५ तर शॉ २४ धावा करून तंबूत परतला.
पॉवरप्लेमध्ये गमावल्या तीन महत्वाच्या विकेट्स
दिल्ली कॅपिटल्स पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये त्यांच्या महत्वाच्या तीन विकेट्स गमावल्या. त्यांना वॉर्नरच्या रूपात पहिला झटका मिळाला. वॉर्रने ६ चेंडू खेळले आणि अवघ्या ५ धावा करून बाद झाला. त्यानंतर चौथ्या षटकात मिचेल मार्श शून्य धावांवर बाद झाला. तसेच, पॉवरप्ले संपण्याच्या आधी पृथ्वी शॉ देखील २४ धावा करून बाद झाला.
बुमराहच्या गोलंदाजीपुढे ठरले सर्वजण अपयशी
दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांकडे मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या वेगवान चेंडूला उत्तर देता आले नाही. बुमराहने टाकलेल्या ४ षटकांमध्ये २५ धावा खर्च केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. पृथ्वी शॉ, मिचेल मार्श आणि रोवमन पॉवेल यांना बुमराहने तंबूत धाडले.
रिषभ पंतने सोडला ब्रेविसचा सोपा झेल
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांना दिल्लीच्या गोलंदाजांनी अधिक धावा करू दिल्या नाहीत, पण अशातच कर्णधार आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने यष्टीपाठी एक सोपा झेल सोडला. मुंबईचा युवा फलंदाज डिवाल्ड ब्रेविसला पंतमुळे जीवनदान मिळाले. त्यानंतर ब्रेविसने ३७ धावांची खेळी केली, ज्यामध्ये तीन षटकारांचा समावेश होता.
टिम डेविडच्या विरोधात नाही घेतला रिव्यू
मुंबईचा टिम डेविड खेळपट्टीवर आला आणि पहिलाच चेंडू त्याच्या बॅटला लागून यष्टीपाठी रिषभ पंतने झेलला. पंतने विकेटसाठी अपील केली, पण पंचांनी ती फेटाळली. त्यावेळी दिल्ली कॅपिटल्सकडे रिव्यू शिल्लक होता, पण पंतने रिव्यू घेतला नाही. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरला, कारण नंतर जेव्हा स्निको मीटरमध्ये पाहिले गेले, तेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली संघाला डेविडची ही विकेट खूपच महागात पडली. त्याने अवघ्या ११ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ३४ धावांचे योगदान दिले आणि संघाचा विजय सोपा बनवला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्यांच्यामुळे रिव्ह्यू नाही घेतला’, डेविडला मिळालेल्या जीवनदानावर रिषभ पंतचे स्पष्टीकरण
आयपीएलच्या १५ हंगामात शेवटून पहिला नंबर काढणारे संघ; याबाबतीत दिल्ली ‘टॉपर’
रिषभ पंतची चूक नडली? ‘तो’ निर्णय घेतला असता, तर कदाचीत दिल्ली प्लेऑफ खेळली असती