मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर रविवारी (१ मे) आयपीएल २०२२मधील डबल हेडरचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत झाली. लखनऊने यामध्ये ६ धावांनी विजय मिळवला आणि गुणतालिकेत दुसरा क्रमांक पटकावला. दरम्यान, दिल्लीचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉसाठी हा सामना निराशाजनक राहिला. शॉ फलंदाजीत योगदान देऊ शकला नाहीच, पण त्याला आर्थिक नुकसान देखील सोसावे लागले आहे.
लखनऊ विरुद्धच्या या सामन्यात दिल्लीचे सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) संघाची धावसंख्या १३ असताना विकेट गमावून बसले. फलंदाजी अपयशी ठरलेल्या शॉला आयपीएलच्या आचार संहितेच्या उल्लंघनासाठी फटकारले गेले. आयपीएल आचार संहितेच्या कलम २.२ अनुसार शॉने लेवल १चा अपराध केला आहे आणि त्याने स्वतः देखील हे मान्य केले आहे. लेवल १चा गुन्हा केल्यामुळे शॉला सामना फीजच्या २५ टक्के आर्थिक दंड ठोठावला गेला असल्याचीही माहिती आहे. असे असले, तरीही त्याने नेमका काय गुन्हा केला आहे, याविषयी कसलीही माहिती अद्याप दिली गेली नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. प्रथम फलंदाजी करताना लखनऊने ३ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स मर्यादित २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १८९ धावांपर्यंत मजल मारू शकला. परिणामी लखनऊने ६ धावांनी विजय मिळवला.