आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. त्यामुळे सर्व संघाची लगबग वाढली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडेही सर्वांचे लक्ष आहे. कारण गेल्या हंगामात या संघाने अंतिम फेरी गाठली होती. परंतु असे असूनही कर्णधार ओएन मॉर्गनला केकेआर संघ रिटेन करण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर पॅट कमिन्ससारख्या महागड्या गोलंदाजालाही संघ मुक्त करू शकतो.
मागील मेगा लिलावाप्रमाणे केकेआर पुन्हा एकदा स्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेलला रिटेन करणार आहे. शेवटचे दोन हंगामात रसेलने अपेक्षेप्रमाणे खेळ केला नव्हता. मात्र, या अनुभवी खेळाडूने संघाला दोनदा जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच, जेव्हा रसेल सारखे खेळाडु लिलावात जातात तेव्हा त्यांना पुन्हा विकत घेणे सोपे नसते. म्हणून रसेल केकेआरचा अविभाज्य भाग बनला आहे.
रसेलप्रमाणेच गेल्या अनेक वर्षांपासून संघाचा भाग असलेला वेस्ट इंडीजचा फिरकीपटू सुनील नरीनलाही रिटेन करणे जवळपास निश्चित झाले आहे. नरीनने गेल्या हंगामात आपला जुना फॉर्म परत मिळवताना किफायतशीर गोलंदाजी करत विकेट्सही घेतल्या होत्या. तसेच, संघाला अंतिम फेरीत नेत असताना नरीनने काही उपयुक्त खेळ्या खेळल्या होत्या. अशा परिस्थितीत केकेआरचा त्याच्यावरील विश्वास अबाधित आहे.
गेल्या दोन हंगामात केकेआरचा सर्वात यशस्वी खेळाडू असलेला मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला रिटेन करणे जवळपास निश्चित झाले आहे. वरुणने गेल्या हंगामात संघासाठी सर्वाधिक १८ विकेट घेतल्या होत्या. त्या मागील हंगामातही त्याने १८ विकेट घेतल्या होत्या.
केकेआरसमोर चौथा खेळाडू हे सर्वात मोठे आव्हान आहे. शुबमन गिलच्या रुपात केकेआर गेल्या ३ हंगामापासून भविष्यासाठीचे आपले नियोजन करत आहे. मात्र, या हंगामात केकेआरला यूएईमध्ये छाप पाडणाऱ्या व्यंकटेश अय्यरमध्ये नवा स्टार सापडला आहे. आक्रमक फलंदाज असण्यासोबतच अय्यर हा एक उपयुक्त गोलंदाजही आहे आणि अशा परिस्थितीत त्याचा दावा मजबूत आहे. एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाच्या माहितीनुसार, केकेआर आपला चौथा रिटेन खेळाडू म्हणून अय्यरला कायम करणे जवळपास नक्की झाले आहे.