आयपीएल २०२२ चा मेगा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या चार रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करायची आहे. त्यामुळे सर्व संघाची लगबग वाढलेली दिसतेय. न्यूझीलंडविरुद्ध केएस भरतने केलेल्या उत्कृष्ट यष्टीरक्षणानंतर, आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझी त्याला आपल्या संघात रिटेन करू शकते. विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलला रिटेन करण्याचा निर्णय आरसीबीने आधीच घेतला आहे. अशा स्थितीत आणखी दोन खेळाडूंची नावे निश्चित करावी लागणार आहेत. माहितीनुसार, केएस भरतला आयपीएल २०२२ साठी माजी कर्णधार विराट कोहली आणि ग्लेन मॅक्सवेलसह तिसरा खेळाडू म्हणून रिटेन केला जाऊ शकतो. देवदत्त पडिक्कल आणि मोहम्मद सिराज यांच्यापेक्षा त्याला महत्त्व दिले जाऊ शकते.
आयपीएल २०२२ साठी मेगा लिलाव होणार आहे. प्रत्येक संघ फक्त चार खेळाडू रिटेन करू शकतात. संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत यादी सादर करायची आहे. अशा स्थितीत केएस भरतने न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या उत्कृष्ट यष्टीरक्षणामुळे त्याला रिटेन करण्याची शक्यता बळावली आहे. आयपीएलच्या चौदाव्या हंगामात त्याने शानदार कामगिरी केली. आरसीबीसाठी पदार्पण करताना त्याने ८ सामन्यात ३८.२ च्या सरासरीने १९१ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय पदार्पण न करताही त्याने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात यष्टीरक्षण केले आहे. या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. वृद्धिमान साहाच्या मानेचे स्नायू ताणल्या गेल्याने, त्याला ही संधी मिळाली. ज्याचा त्याने चांगलाच फायदा करून घेतला आहे. यष्टीरक्षणादरम्यान त्याने दोन झेल घेतले तसेच एका फलंदाजाला यष्टिचीतही केले. आपल्या यष्टीरक्षणाने त्याने सर्वांना प्रभावित केले आहे.
आरसीबीच्या सूत्रानुसार, केएस भरत हा एक मोठा खेळाडू आहे आणि तो ज्या संघासाठी खेळतो त्यांच्यासाठी तो उत्कृष्ट कामगिरी करतो. एबी डिव्हिलियर्स आता आरसीबीसोबत नाहीत. अशा स्थितीत भरतला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळताना दिसत आहे. एबी डिव्हिलियर्सशी त्याची तुलना कोणी करत नसला तरी, तो डिव्हिलियर्सचा चांगला पर्याय ठरू शकतो. याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी त्याला रिटेन करण्याची शक्यता वाढली आहे.