जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) कोची येथे पार पडत असलेल्या आयपीएल 2023 च्या मिनी लिलावावर लागले आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामापूर्वी या मिनी लिलावात 405 खेळाडूंवर बोली लागणार आहे. तसेच, या लिवावात सर्व 10 संघांकडे एकूण 206.6 कोटी रुपये आहेत. आयपीएल लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडत असतो. प्रत्येक संघांमध्ये खेळाडूंना आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी शर्यत लागलेली असते. तसेच, अनेकदा 1 कोटींवरून सुरू झालेली बोली अचानक 10 कोटींच्याही पार जाते. मात्र, या खेळाडूंवर इतका पैसा खर्च करणारे संघ पैसा कसा कमावतात? चला जाणून घेऊया…
कमाईचे सर्वात मोठे स्त्रोत
आयपीएलचे (IPL) संचालन भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) करते. या दोघांच्याही कमाईचा मोठा स्त्रोत हा मीडिया आणि ब्रॉडकास्ट आहे. आयपीएल फ्रँचायझी त्यांचे मीडिया आणि ब्रॉडकास्ट हक्क विकून त्यातून सर्वाधिक पैशांची कमाई करतात. सध्या ब्रॉडकास्टिंगचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. एका रिपोर्टनुसार, सुरुवातीला ब्रॉडकास्टिंगच्या हक्कातून होणाऱ्या कमाईचा 20 टक्के भाग बीसीसीआय स्वत:कडे ठेवायचा. तसेच, 80 टक्के रक्कम संघांना मिळायची. मात्र, हळूहळू हे अंतर 50-50 टक्क्यांवर आले आहे.
जाहिरातींमधून होते जोरदार कमाई
आयपीएल फ्रँचायझी मीडिया हक्क विकण्याव्यतिरिक्त जाहिरातींमधूनही चिक्कार पैसा कमावतात. खेळाडूंच्या टोपी, जर्सी आणि हेल्मेटवर दिसणाऱ्या कंपन्यांचे नाव आणि लोगोसाठीही कंपन्या फ्रँचायझींवर मोठी रक्कम देतात. आयपीएलदरम्यान फ्रँचायझींचे खेळाडू अनेकदा जाहिराती शूट करतात. यामधूनही कमाई होते. एकूणच जाहिरातींमधूनही आयपीएल संघाना मोठी रक्कम मिळते.
तीन भागात महसूलचे विभाजन
संघ कशाप्रकारे कमाई करतात, हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वप्रथम आयपीएल संघांची कमाई तीन भागात वाटली जाते. त्यात केंद्रीय महसूल, प्रमोशनल महसूल आणि स्थानिक महसूल यांचा समावेश होतो. केंद्रीय महसूलात मीडिया ब्रॉडकास्टिंग हक्क आणि शीर्षक स्पॉन्सरशिप यांचा समावेश होतो. यामधून संघ 60 ते 70 टक्के कमाई करतात.
यातील दुसरी गोष्ट आहे जाहिराती आणि प्रमोशनल महसूल. यामधून संघ जवळपास 20 ते 30 टक्के कमाई करतात. दुसरीकडे, स्थानिक महसूलातून संघांच्या कमाईचा 10 टक्के भाग येतो. यात तिकिटांची विक्री आणि इतर गोष्टींचाही समावेश आहे.
प्रत्येक हंगामात 7 ते 8 स्थानिक सामन्यांतून फ्रँचायझी मालक तिकीट विक्रीतून जवळपास 80 टक्के महसूल आपल्याकडे ठेवतात. इतर 20 टक्के भाग बीसीसीआय आणि प्रायोजकांमध्ये वाटला जातो. तिकीट विक्रीतून होणारे उत्पन्न हे साधारणत: संघाच्या कमाईच्या 10 ते 15 टक्के असते. जर्सी, टोपी आणि इतर ऍक्सेसरीज सारख्या व्यापारी मालाची विक्री करून कमाईचा एक छोटासा भाग देखील तयार करतात.
लोकप्रियता आणि बाजार मूल्यामध्ये फायदा
सन 2008मध्ये सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत भारतीय व्यावसायिक आणि काही प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी 8 फ्रँचायझी विकत घेण्यासाठी तब्बल 723.59 मिलिनय डॉलर (जवळपास 590 कोटी) खर्च केले होते. आता दीड दशकानंतर आयपीएलची लोकप्रियता आणि बाजार मूल्यामध्ये अधिक पटींनी वाढ झाली आहे. 2021मध्ये सीव्हीसी कॅपिटलने (एक ब्रिटिश इक्विटी फर्म) गुजरात टायटन्स फ्रँचायझीसाठी जवळपास 740 मिलियन डॉलर्स खर्च केले होते. (ipl 2023 mini auction where does the money come from to buy players in ipl auction know here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Auction 2023: मागील लिलावापेक्षा यंदाच्या खर्चात 350 कोटी रुपयांची कपात! जाणून घ्या कारण
BANvIND: दुसऱ्या दिवशीच्या सुरूवातीलाच भारताला दोन धक्के, राहुल-गिल स्वस्तात ‘आऊट’