आयपीएल 2024 मध्ये सोमवारी (1 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. या सामन्यात राजस्थाननं मुंबईवर 6 गडी राखून विजय मिळवला. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबईची टीम निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून अवघ्या 125 धावाच करू शकली. राजस्थाननं 126 धावांचं लक्ष्य 15.3 षटकांत 4 विकेट गमावून गाठलं.
राजस्थानकडून रियान परागनं शानदार फलंदाजी करत आयपीएलमधील सलग दुसरं अर्धशतक साजरं केलं. तो 39 चेंडूत 54 धावा करून नाबाद राहिला. त्याला आर अश्विननं चांगली साथ दिली. तो 16 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल 10(6), संजू सॅमसन 12(10) आणि जोस बटलर 13(16) यांनीही योगदान दिलं.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 125 धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पांड्यानं 21 चेंडूत 34 आणि तिलक वर्मानं 29 चेंडूत 32 धावा केल्या. राजस्थानसाठी ट्रेंट बोल्ट (22 धावांत 3 बळी) आणि युजवेंद्र चहल (11 धावांत 3 बळी) यांनी घातक गोलंदाजी केली. याशिवाय वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गरनं 2 गडी बाद केले.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली. बोल्टनं पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि नमन धीर यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानं तिसऱ्या षटकात डेवाल्ड ब्रेव्हिसला बाद केलं. तिघेही शून्यावर बाद झाले. ईशान किशनला (16) मोठी खेळी खेळता आली नाही. मुंबईच्या अवघ्या 20 धावांवर चार विकेट पडल्या होत्या यावरून त्यांच्या खराब स्थितीचा अंदाज लावता येतो.
यानंतर हार्दिक आणि तिळक वर्मा यांनी पाचव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी करत विकेट्सची पडझड थांबवली. चहलनं 10व्या षटकात हार्दिकची आणि 14व्या षटकात तिलकची शिकार केली. टीम डेव्हिड (17) छाप सोडू शकला नाही. पीयूष चावला केवळ 3 धावा करू शकला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 –
मुंबई इंडियन्स – ईशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, क्वेना मफाका
इम्पॅक्ट प्लेअर्स – डेवाल्ड ब्रेव्हिस, नुवान तुषारा, रोमॅरियो शेफर्ड, नेहाल वढेरा, शम्स मुलानी
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स – रोवमन पॉवेल, तनुष कोटियन, कुलदीप सेन, शुभम दुबे, आबिद मुश्ताक
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये रचला इतिहास, आजपर्यंत कोणताही संघ हा पराक्रम करू शकला नाही
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज, रोहित शर्माच्या नावे लज्जास्पद विक्रम
ज्याची भीती होती तेच झालं! वानखेडेमध्ये हार्दिक पांड्याविरुद्ध जोरदार बूइंग, ‘रोहित-रोहित’च्या घोषणा