२००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग सुरू झाली. तेव्हापासून या स्पर्धेने कोट्यवधी लोकांना वेड लावले आहे. प्रत्येक वर्षी या स्पर्धेत नवीन काहीतरी घडत राहते. प्रत्येक वर्षी काही संघ चमकदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतात. परंतु, आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासाबद्दल सांगायचे तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या फक्त दोन संघांना सर्वात जास्त यश मिळाले आहे. यातील पहिले नाव मुंबई इंडियन्स आणि दुसरे नाव चेन्नई सुपर किंग्ज आहे. मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे तर चेन्नई सुपर किंग्जनेही तीन वेळा आयपीएल चषक जिंकला आहे.
असे असले तरी प्रत्येकवर्षी गुणतालिकेत पहिल्या ४ क्रमांकांमध्ये येण्यासाठी सर्व संघ मेहनत घेत असतात. त्यामुळे यासाठी सर्व संघांमध्ये चुरस पहायला मिळते. या लेखात अशा तीन संघांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा पहिल्या ४ संघांमध्ये प्रवेश केला आहे.
हे आहेत ते तीन संघ –
३. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आयपीएलच्या इतिहासात एकदाही चॅम्पियन होण्याचा मान मिळविला नसला तरी आयपीएलच्या १२ वर्षाच्या इतिहासात या संघाने ५ वेळा गुणतालिकेत पहिल्या ४ संघांमध्ये स्थान मिळवले आहे. यात संघाने २००९ मध्ये प्रथमच पहिल्या ४ संघांमध्ये प्रवेश करत दुसरे स्थान मिळवले होते. त्यानंतर आयपीएल २०१० मध्ये संघाने तिसरे स्थान मिळविले. आयपीएल २०११ मध्ये संघाने दुसरे स्थान मिळविले. २०१५ मध्ये संघ तिसऱ्या आणि २०१६ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
२. मुंबई इंडियन्स
इंडियन प्रीमियर लीगमधील जवळपास सर्वच संघ दरवर्षी चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतात पण मुंबई इंडियन्स या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे. संघाला पहिल्यांदा आयपीएल २०१३ मध्ये चॅम्पियन होण्याचा मान मिळाला होता. तर हा संघ आयपीएल २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये देखील चॅम्पियन झाला आहे. चार वेळा आयपीएल चॅम्पियन होण्याशिवाय हा संघ दोनदा पहिल्या ४ संघांमध्ये आला आहे. ज्यात पहिल्यांदा या संघाने आयपीएल २०१० मध्ये दुसरे स्थान पटकावले तर आयपीएल २०११ मध्ये हा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.
१. चेन्नई सुपरकिंग्ज
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, तशी कामगिरी करणे कोणत्याही संघाला अशक्य आहे. चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत आयपीएलमध्ये २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली आहे. या संघाने आत्तापर्यंत १० हंगाम खेळले आहेत. तर त्यांच्यावर २०१६ आणि २०१७ ला बंदी असल्याने या २ वर्षी ते आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकले नाही. पण असे असले तरी त्यांनी खेळलेल्या सर्व १० हंगामात पहिल्या ४ संघांमध्ये प्रवेश केला आहे. हा संघ २००८ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर २००९ मध्ये उपांत्य फेरी गाठली. याशिवाय २०१२ आणि २०१३ मध्ये संघाने दुसरे स्थान पटकावले. २०१४ मध्ये संघ तिसऱ्या स्थानावर तर २०१५ मध्ये संघाने दुसरे स्थान मिळवले. २०१९ लाही चेन्नईने गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले होते.