क्रिकेटचा महासंग्राम इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या हंगामाचा पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) यांच्यात रंगणार आहे. या रोमांचक सामन्यापूर्वी एक भव्य उद्घाटन समारंभही आयोजित करण्यात येणार आहे.
आयपीएल 2025च्या उद्घाटन सोहळ्यासाठी ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता सज्ज झाले आहे. हा शानदार सोहळा 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. त्यानंतर टॉस संध्याकाळी 7 वाजता होईल, आणि पहिला सामना 7.30 वाजता खेळला जाईल.
प्रत्येक आयपीएल हंगामाचा शुभारंभ एका ग्रँड समारंभाने केला जातो. यंदाच्या समारंभात देखील बॉलिवूडमधील नामवंत कलाकार आपली अदाकारी सादर करणार आहेत. कोणते कलाकार परफॉर्म करणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. लाईव्ह म्युझिक, लेझर शो आणि विविध आकर्षक परफॉर्मन्सेस या सोहळ्यात रंगत आणणार आहेत.
आरसीबीने यंदा रजत पाटीदारला कर्णधारपद सोपवले असून, केकेआरची सूत्रे अनुभवी अजिंक्य रहाणेच्या हाती आहेत. दोन्ही संघ सज्ज असून, नव्या कर्णधारांच्या नेतृत्वात त्यांच्या पहिल्या सामन्यात काय चमत्कार घडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्घाटन सोहळा आणि केकेआर-आरसीबी सामना पाहण्यासाठी तिकीट विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. BookMyShow वर ऑनलाइन तिकीट उपलब्ध असून, किमान किंमत 3500 रुपये आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
यंदाच्या हंगामात 10 संघ आमनेसामने येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स, लखनऊ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळेल. यंदाच्या हंगामात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.