आयपीएल २०२१ ची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडेल. तत्पूर्वी, प्रत्येक फ्रेंचायजी काही ना काही कारणाने चर्चेत आहेत. त्याच अनुषंगाने, किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आपल्या संघाचे नाव व लोगोमध्ये बदल करण्याचे सोपस्कार पूर्ण केले.
‘हे’ आहे नवीन नाव
पंजाब फ्रेंचायजी आपल्या संघाचे नाव बदलणार याबाबतची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. बुधवारी(१७ फेब्रुवारी) संघाने या बाबतची अधिकृत घोषणा केली. किंग्स इलेव्हन पंजाब असे नाव असलेली पंजाब फ्रेंचायजी आता ‘पंजाब किंग्स’ या नावाने ओळखली जाईल. पंजाब संघाचे सहमालक मोहित बर्मन यांनी सांगितल्याप्रमाणे, चाहत्यांच्या मागणीमुळे संघाचे नाव बदलण्यात आले आहे. संघाचे नाव बदलण्याचा हेतू हा फ्रेंचायजीला नवीन रूप देणे हा होता.
असा आहे नवा लोगो
संघाच्या नावासोबतच पंजाब फ्रेंचायजीने आपल्या लोगोमध्ये देखील बदल केला आहे. पूर्वीच्या लोगोमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब या नावासह दोन बाजूला दोन सिंहाची तोंडे होती. तसेच, वरच्या बाजूला जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश या राज्यांचे प्रतिनिधित्व करणारी KJHPH अशी अक्षरे लिहिली होती.
नव्या लोगोमध्ये एका विशिष्ट आकारात पंजाब किंग्स अशी अक्षरे लिहिली आहेत. तसेच, पूर्वीच्या दोन सिंहा ऐवजी एकच सिंह गर्जना करताना दिसत आहे. बाजूने सोनेरी कडा लोगोची शोभा वाढवते.
New logo of Punjab Kings. #IPL2021 #KingsXIPunjab #PunjabKings pic.twitter.com/I6T2MzCIsd
— Subhayan Chakraborty (@CricSubhayan) February 17, 2021
हा आहे लोगोचा अर्थ
पंजाब फ्रेंचायजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश मेनन यांनी संघाच्या नव्या लोगोचा अर्थ सांगितला. मेनन म्हणाले,
“पंजाब किंग्स हे एक उत्तम ब्रँड नाव बनू शकते. नवीन लोगो चैतन्याचे, ब्रँडचा जिवंतपणा आणि आधुनिकतेचे प्रतीक आहे. यातून इतर संघापेक्षा आमचे वेगळेपण दिसून येईल.”
आयपीएलची प्रसिद्ध फ्रेंचायजी आहे पंजाब
आयपीएलच्या सुरुवातीपासून पंजाब फ्रेंचायजी आयपीएलशी संलग्न आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा, उद्योगपती नेस वाडिया, डाबर कंपनीचे मोहित बर्मन व करण पॉल हे संघाचे मालक आहेत. सध्या पंजाब संघाचे नेतृत्व केएल राहुल करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ : सर्वाधिक रकमेसह लिलावात उतरणाऱ्या पंजाब संघाचे ‘या’ खेळाडूंवर असेल लक्ष
धक्कादायक!! चालू क्रिकेट सामन्यात क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकने मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना
विशेष लेख: खरंच गेल्या १३ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै