एप्रिल २००८ मध्ये, जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला म्हणजेच आयपीएलला सुरुवात झाली. यंदा इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा सत्र सुरू आहे. कोरोना संक्रमणामुळे यंदाचे सामने यूएईच्या मैदनात खेळले जात आहेत. टी२० स्वरूपात फलंदाजांनी नेहमीच वर्चस्व राखले आहे.
आयपीएल म्हटलं कि, चाहत्यांना नेहमीच मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असते. यामध्ये २०० धावा म्हणजे अनेकदा विजयी धावसंख्या मनाली जाते. आयपीएलच्या पहिल्या हंगामातील पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध २२२ धावांचं डोंगर उभं केलं होता. त्यात ब्रेंडन मॅक्यूलमने जबरदस्त नाबाद १५८ धावांची खेळी केली होती.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या नावावर आहे. पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध त्यांनी २६३ धावा केल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आरसीबीनेच केला आहे, तर आयपीएलमध्ये सर्वात कमी वेळा २००चा टप्पा दिल्ली कॅपिटल्सने पार केला आहे.
आता आयपीएलमध्ये संघांनी कितीवेळी २०० धावा केल्या आहेत ते पाहूया.
१. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला आयपीएलमध्ये एखादाही हे विजेतेपद मिळविता आलेले नाही, परंतु आयपीएलमध्ये त्यांनी सर्वाधिक वेळा २०० धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आतापर्यंत १८ वेळा २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
बेंगलोर संघाची सर्वाधिक धावसंख्या २६३ अशी आहे, जी त्यांनी २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध घरच्याच मैदानावर केली होती. या सामन्यात ख्रिस गेलने तुफानी फलंदाजी करत नाबाद १७५ धावा ठोकल्या. ही खेळी देखील आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी खेळी आहे.
चेन्नई सुपर किंग्ज
एमएस धोनीच्या नेतृत्वात तीन वेळा आयपीएल जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने आतापर्यंत २०० पेक्षा अधिक धावा १७ वेळा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाची सर्वाधिक धावसंख्या २४६ अशी आहे, जी त्यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३ एप्रिल २०१८ रोजी चेन्नई येथील घरच्याच मैदनात केली होती.
त्याशिवाय आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने सर्वप्रथम २००८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध २०० च्या पार धावा केल्या होता. त्या सामन्यात सीएसकेने २४० धावा केल्या होत्या.
किंग्ज इलेव्हन पंजाब
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर प्रमाणेच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला देखील एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही, परंतु त्यांनी १३ वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात २०० पेक्षा जास्त धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने २०७ धावा केल्या पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
आयपीएलमधील पंजाबची सर्वाधिक धावसंख्या २३२ अशी आहे. जी त्यांनी २०११ मध्ये धर्मशाला येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध केली होती.
मुंबई इंडियन्स
४ वेळा आयपीएल विजेतेपद मिळविणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ११ वेळा २०० धावांचा आकडा पार केला आहे. मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम २३ एप्रिल २००८ रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध २०२ धावा करून २०० धावांचा आकडा पार केला होता. मुंबई इंडियन्सची २२३ अशी सर्वाधिक धावसंख्या असून, त्यांनी धावांचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मे २०१७ मध्ये हा पराक्रम केला. मात्र मुंबईने हा सामना गमावला.
कोलकाता नाइट रायडर्स
दोनदा आयपीएल जिंकणार्या कोलकाता नाईट रायडर्सने ११ वेळा २०० चा आकडा पार केला आहे. २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या सामन्यात केकेआरने प्रथम २०० धावांचा टप्पा ओलांडला आणि बंगळुरुमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध २२२ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील त्याची सर्वोच्च धावसंख्या २४५ आहे, जी त्यांनी इंदोरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध २०१८ मध्ये केली होती.
सनरायझर्स हैदराबाद
२०१६ मध्ये प्रथमच आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि अल्पावधीतच हंगामात त्यांनी १० वेळा २०० चा आकडा पार केला आहे. २०१४ मध्ये हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध २०५ धावा केल्या. तसेच आयपीएलच्या इतिहासातील त्यांची सर्वोच्च धावसंख्या २३१ अशी आहे, जी त्यानी मार्च २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध केली होती.
राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्स हा आयपीएलच्या पहिल्याच मोसमातील विजयी संघ. या संघाने आतापर्यंत ८ वेळा २०० चा आकडा पार केला आहे. राजस्थानने एप्रिल २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध प्रथमच २१७ अशी धावसंख्या उभारली. याशिवाय आयपीएलच्या इतिहासातील त्यांची सर्वाधिक धावसंख्या २२३ अशी आहे, जी त्यांनी २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध केली होती. परंतु तो सामना त्यांनी गमावला होता.
दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्स (आधी – दिल्ली डेअरडेव्हिल्स) संघ देखील एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकलेला नाही. दिल्ली संघाने आतापर्यंत सर्वात कमी म्हणजे ६ वेळा २०० धावा पार केल्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने एप्रिल २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध प्रथमच २३१ धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासातील हीच त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. दिल्ली कॅपिटल्सनी त्यांच्या घरच्याच मैदानावर ६ पैकी ४ वेळा २०० धावा पार केल्या आहेत.
(टीप : यात डेक्कन चार्जर्स, कोची टस्कर्स केरळ, पुणे वॉरियर्स इंडिया, राइजिंग पुणे सुपरगिजियंट आणि गुजरात लायन्स यांच्या आकडेवारीचा समावेश नाही.)