मुंबई । भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये साऱ्यांनाच प्रभावित केले होते. 2005 त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी फलंदाजीत प्रमोशन देखील मिळाले. पठाणला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची आयडिया कुणाची होती, याचा खुलासा नुकताच इरफान पठाणने केला आहे.
पठाणला पहिल्यांदा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाठवले होते. यात त्याने 70 चेंडूत 83 धावांची आक्रमक खेळी केली. हा सामना भारताने 152 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर इरफान पठाणने अनेकदा टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करताना दिसून आला. वास्तविक पाहता इरफान पठाण हा गोलंदाज होता. मात्र, त्याच्या फलंदाजीचे कौशल्य पाहून संघ व्यवस्थापन एक अष्टपैलू खेळाडू बनवण्यासाठी प्रयत्न करत होता. संघ व्यवस्थापनाचा हा प्रयोग जास्त काळ चालला नाही. पुढे तो अयशस्वी ठरला.
इरफान रौनक कपूरबरोबर इन्स्टाग्रामवर बोलताना म्हणाला, “क्रिकेटमधील माझी कारकीर्द संपवण्यासाठी ग्रेग चॅपल यांचा हात होता असे बऱ्याचवेळा म्हटले गेले. पण हे चुकीचे आहे. तसेच फलंदाजीत तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याची आयडिया ही चॅपल यांची नसून सचिन पाजींची होती.”
तो म्हणाला, “माझ्याकडे षटकार मारण्याची क्षमता असल्याने मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्यासाठी सचिन पाजी यांनी राहुल द्रविडला सल्ला दिला होता. सचिन पाजी म्हणाले होते की, नव्या चेंडूने मी वेगाने धावा काढू शकतो. तसेच वेगवान गोलंदाजांचा सामना चांगल्या पद्धतीनं करू शकतो, म्हणून मला त्यांनी फलंदाजीत प्रमोट करण्यासाठी सांगितले होते.”
“श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत वेगवान गोलंदाज दिलहारा फर्नांडो हा स्लोअर बॉल चांगला फेकत होता. तसेच मुथैया मुरलीधरन हा देखील शानदार फॉर्ममध्ये होता. त्यांच्या विरोधात आक्रमक खेळण्यासाठी मला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्यात आले होते. चॅपल यांच्यामुळे माझी कारकीर्द संपली असे म्हणणे चुकीचे आहे. ते भारतीय नाहीत म्हणून त्यांना टार्गेट करणे सोपे आहे,” असे इरफान पठाणने सांगितले.
इरफान पठाणने भारताकडून खेळताना 29 कसोटी सामन्यात 100 तर 120 वनडे सामन्यात 173 बळी टिपले. याचसोबत फलंदाजीत चुणूक दाखवत 1105 कसोटीत आणि वनडेत 1544 धावा केल्या. 24 टी 20 सामन्यात 28 बळी आणि 172 धावा त्याच्या नावावर आहेत. इरफानने आयपीएलच्या 103 सामन्यात 80 बळी टिपले तसेच 1139 धावा केल्या आहेत.