भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (२१ जून) कोलकत्ता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झालेले ईशान किशन आणि दीपक चहर हे दोन खेळाडू या मालिकेनंतर त्वरित दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. सध्या भारताचा अ संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, हे दोघे त्या संघात सामील होणार आहेत.
या दिवशी होणार दक्षिण आफ्रिकेला रवाना
न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा टी२० सामना झाल्यानंतर २४ तारखेला यष्टीरक्षक ईशान किशन व वेगवान गोलंदाज दीपक चहर मुंबई येथे पोहोचतील. त्यानंतर हे दोघे आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर हादेखील दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी १४ सदस्यीय भारत अ संघाची निवड केली होती. हा संघ मागील आठवड्यातच ब्लोएमफॉटेन येथे पोहोचला आहे. त्यानंतर अनुभवी फलंदाज हनुमा विहारी याला देखील या संघात सामील केले गेले होते.
ईशान किशन दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दुसरा यष्टीरक्षक असेल. या दौऱ्यासाठी पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक म्हणून उपेन्द्र यादव याची निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, दीपक चहर हा नवदीप सैनी, अर्झान नागवासवाला, ईशान पोरेल व उमरान मलिक या वेगवान गोलंदाजी विभागाला मदत करेल.
असा असेल दौरा
भारतीय संघाच्या दौऱ्यावर तीन चार दिवसीय सामने खेळणार आहे. मालिकेला २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे २९ नोव्हेंबर आणि ६ डिसेंबर रोजी सुरू होतील. हे सर्व सामने ब्लोएमफॉटेन येथे खेळले जातील. सलामीवीर प्रियांक पांचाळ भारताचे नेतृत्व करेल.
दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी भारत अ संघ-
प्रियांक पांचाल (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (यष्टिरक्षक), के गौतम, राहुल चाहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उमरान मलिक, ईशान पोरेल, अर्झान नागासवाला, हनुमा विहारी, ईशान किशन व दीपक चहर.