कोलंबो। श्रीलंका विरुद्ध भारत संघात रविवारी(१८ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात २३ वर्षीय इशान किशनने अर्धशतकी खेळी करत महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबर एक खास विक्रमही त्याने केला आहे.
इशान किशनचे विक्रमी पदार्पण
रविवारी इशान किशनने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. या सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २६३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा भारताकडून पाठलाग करताना इशानने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४२ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली.
विशेष म्हणजे इशानने याचवर्षी अहमदाबाद येथे १४ मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करताना ३२ चेंडूत ५६ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडे आणि टी२० प्रकारातील पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणारा केवळ दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे.
यापूर्वी असा पराक्रम केवळ दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी वॅन दर दसेनला करता आला होता. दसेनने वनडे पदार्पणात ९३ धावांची खेळी केली होती, तर आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणात ५६ धावांची खेळी केली होती.
इशानसाठी २३ वा वाढदिवस खास
रविवारी इशानचा २३ वा वाढदिवस देखील होता. त्यामुळे त्याच्यासाठी हा वाढदिवस आणखी खास ठरला. इशान वाढदिवशी वनडे पदार्पण करणारा आणि ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा पहिला खेळाडूही ठरला आहे.
भारताचा विजय
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २६२ धावा केल्या. त्यांच्याकडून चमिका करुणारत्नेने १ चौकार आणि २ षटकारांसह ३५ चेंडूत सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या. तसेच भारताकडून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि दीपक चाहर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल भारताकडून इशानव्यतिरिक्त शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी केली. तर पृथ्वी शॉने ४३ धावा केल्या. त्यामुळे भारताने हा सामना ३६.४ षटकात २६३ धावा पूर्ण करत सहज जिंकला. श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवशी ‘अशी’ अद्वितीय कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज बनला इशान किशन
पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत इशानने केला मोठा प्रताप, ‘अशी’ कामगिरी करणारा बनला जगातील पाचवा फलंदाज
शिखरचा ‘गब्बर’ विक्रम! गांगुलीसह विव रिचर्ड्ससारख्या दिग्गजांनाही टाकले मागे