आज क्रीडा क्षेत्रातील यावर्षीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची अंतिम निवड क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेटपटू इशांत शर्मा, दिप्ती शर्मासह एकूण २७ जणांची निवड झाली आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) शिखर धवन, इशांत शर्मा आणि दिप्ती शर्माची २०२० च्या अर्जून पुरस्कारासाठी शिफारस केली होती. यांमधील इशांत आणि दिप्तीची या पुरस्कारासाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.
३१ वर्षीय इशांत शर्माने आतापर्यंत ९७ कसोटी, ८० वनडे व १४ टी२० सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात त्याने एकूण ४१५ बळी मिळवले आहेत. तसेच तो सध्या भारताच्या कसोटी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे.
याबरोबरच २२ वर्षीय अष्टपैलू महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्माने २०१४ ला भारतीय संघात पदार्पण केले होते. तिने ५४ वनडे आणि ४८ टी२० सामने आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळले असून वनडेत १४१७ धावा आणि टी२०मध्ये ४२३ धावा केल्या आहेत. याबरोबरच १८८ धावा ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. याबरोबर तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ११७ विकेट्सही घेतल्या आहेत.
तसेच २०२० अर्जुन पुरस्कारासाठी दूती चंद (ऍथलेटिक्स), मनीष कौशिक (बॉक्सिंग), मनू भाकर (शूटिंग), सात्विकसाईराज रांकिरेड्डी, चिराग शेट्टी(बॅडमिंटन), दिविज शरण(टेनिस) यांसह वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील इतरही खेळाडूंचीही निवड झाली आहे.
त्याचबरोबर भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, पॅरा ऍथलिट मरियप्पन थंगवेलू आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच ५ खेळाडूंना राजीव गांधी खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळणार आहे.
तसेच ५ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंना २९ ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाईल. २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी पुरस्कर वितरण सोहळा कोरोना व्हायरसमुळे ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.
अर्जुन पुरस्कार २०२० साठी निवड झालेले खेळाडू –
१. अतनू दास (तिरंदाजी)
२. शिव केशवन (लुगे)
३. दुती चंद (ऍथलेटिक्स)
४. सात्विकसाईराज रांकीरेड्डी (बॅडमिंटन)
५. चिराग शेट्टी (बॅडमिंटन)
६. विशाल भृगुवंशी (बास्केटबॉल)
७. इशांत शर्मा (क्रिकेट)
८. दीप्ती शर्मा (क्रिकेट)
९. लोव्हलिना बोर्गोहेन (बॉक्सिंग)
१०. मनीष कौशिक (बॉक्सिंग)
११. सावंत अजय अनंत (घोडेस्वार)
१२. संदेश झिंगन (फुटबॉल)
१३. अदिती अशोक (गोल्फ)
१४. आकाशदीप सिंग (हॉकी)
१५. दीपिका ठाकूर (हॉकी)
१६. दीपक निवास हूडा (कबड्डी)
१७. सारिका काळे (खो-खो)
१८. सुयश जाधव (पॅरा-स्विमिंग)
१९. मनीष नरवाल (पॅरा-शूटिंग)
२०. संदीप चौधरी (पॅरा-ऍथलेटिक्स)
२१. सौरभ चौधरी (शूटिंग)
२२. मनु भाकर (शूटिंग)
२३. सानिल शेट्टी (टेबल टेनिस)
२४. दिविज शरण (टेनिस)
२५. दिव्या काक्रान (कुस्ती)
२६. राहुल आवारे (कुस्ती)
२७. दत्तू भोकानल (रोईंग)