fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ISL 2018-19: भेकेच्या अतिरीक्त वेळेतील गोलमुळे गोव्याला हरवून बेंगळुरूचे विजेतेपद

मुंबई: बेंगळुरू एफसीने हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात विजेतेपद पटकावले. मुंबई फुटबॉल एरीनावर सुमारे आठ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अंतिम सामन्यात बेंगळुरूने एफसी गोवा संघावर अतिरीक्त वेळेत 1-0 अशी मात केली. अतिरीक्त वेळ संपण्यास चार मिनिटे बाकी असताना भारतीय खेळाडू राहुल भेके याने केलेला गोल निर्णायक ठरला.

गोव्याला या सत्रात दहा खेळाडूंनीशी खेळावे लागले. याचा फायदा बेंगळुरूच्या कसलेल्या संघाने उठविला. सेट-पीसवरील कौशल्यही बेंगळुरूने दाखवून दिले. गत मोसमात बेंगळुरूला घरच्या मैदानावर अंतिम सामन्यात चेन्नईयीन एफसीकडून पराभूत व्हावे लागले होते. यावेळी बेंगळुरूने आपली मोहिम यशस्वी केली. साखळीत गोव्याविरुद्ध राखलेले वर्चस्व बेंगळुरूने अबाधित राखले. डिमास डेल्गाडोने घेतलेल्या कॉर्नरवर भेकेने ताकदवान हेडींग करीत गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याला चकविले.

अतिरीक्त वेळेतील पहिल्या सत्रातील अखेरच्या मिनिटाला मध्य क्षेत्रातील रेषेपाशी मिकू आणि जाहौह यांच्यात चेंडूवर ताबा मिळविण्यासाठी चुरस झाली. त्यात मिकूने जाहौहला ढकलले, तर पडताना जाहौहने मिकूला किक मारली. त्यामुळे जाहौहला दुसऱ्या यलो कार्डसह मैदान सोडावे लागले. निर्धारीत वेळेतील 47व्या मिनिटाला झिस्को हर्नांडेझला मागून धक्का देत पाडल्यामुळे जाहौहला पहिल्या यलो कार्डला सामोरे जावे लागले होते.

त्याआधी 90 मिनिटांच्या निर्धारीत वेळेत गोलशून्य बरोबरी होती. पहिलाच प्रयत्न बेंगळुरूने दुसऱ्या मिनिटाला केला. निशू कुमारच्या थ्रो-इनवर मिकूने चेंडूवर नियंत्रण मिळविले आणि सुनील छेत्रीला पास दिला. छेत्रीने पहिल्या प्रयत्नात मारलेला फटका मात्र स्वैर होता. चार मिनिटांनी मिकूला बॉक्सलगत छेत्रीने पास दिला. मिकूने नेहमीच्या वेगाने मुसंडी मारली. त्यावेळी गोव्याच्या बचाव फळीला मिकूने पार केले हते, पण गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार पुढे सरसावला. त्याने झेप टाकत चेंडू ताब्यात घेत ही चाल फोल ठरविली.

गोव्याचा पहिला जोरदार प्रयत्न 14व्या मिनिटाला झाला. अहमद जाहौहने डावीकडून आगेकूच करीत जॅकीचंद सिंगला पास दिला. जॅकीचंदने फेरॅन कोरोमीनास याच्या दिशेने चेंडू मारला. कोरोमीनासचा प्रयत्न मात्र चुकला. पाच मिनिटांनी गोव्याचा कर्णधार मंदार राव देसाई याला ऑफसाईड ठरविण्यात आल्यामुळे चाल वाया गेली.

गोव्याने 24व्या मिनिटाला चेंडूवरील ताबा गमावला. परिणामी डावीकडे छेत्रीला संधी मिळाली. त्याच्या पासवर मिकूने हेडिंग केले, पण चेंडू बारवरून बाहेर गेला. बेंगळुरूने 27व्या मिनिटाला लक्षवेधी प्रयत्न केला. उदांताने चेंडूवर ताबा मिळवित नेटच्या दिशेने फटका मारला, पण त्याची ताकद थोडी कमी पडली. हा चेंडू मिकूच्या दिशेने गेला. मिकूने वेगाने धावत फटका मारला, पण मौर्तडा फॉलने हेडींगवर चेंडू रोखला.

निशू कुमारने 31व्या मिनिटाला डावीकडून आगेकूच केली. त्याने जादा ताकद लावल्यामुळे उदांताकडे उजवीकडून आलेला चेंडू अचूक नव्हता. उदांताने फका मारला, पण जादा वेगामुळे चेंडू स्टँडमध्ये गेला.

मौर्तडाने 39व्या मिनिटाला मिकूला मागून धक्का देत पाडले. त्यामुळे त्याला यलो कार्डला सामोरे जावे लागले.

मध्यंतरास चार मिनिटे बाकी असताना मंदार मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे जायबंदी झाला. त्यानंतर पुन्हा त्याच भागाला दुखापत झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी कसून प्रयत्न केले. 55व्या मिनिटाला निशू कुमारने उडवीकडून चाल रचली, पण मौर्तडा फॉलने कसाबसा बचाव केला. तीन मिनिटांनी गोव्याच्या ब्रँडन फर्नांडीसने चाल रचत एदू बेदियाला पास दिला. बेदीयाचा हेडर गुरप्रीतने रोखला.

जॅकीचंदने 67व्या मिनिटाला आणखी एक चाल रचत अहमद जाहौहला बॉक्सजवळ पास दिला, पण जाहौहने थेट गुरप्रीतकडे फटका मारला.

 

निकाल :

बेंगळुरू एफसी :  1 (राहुल भेके 116) विजयी विरुद्ध एफसी गोवा : 0

You might also like