fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

ISL 2018-19: पेनल्टी शुटआऊट टाळू शकल्याचा आनंद – कार्लेस कुआद्रात 

मुंबई: पेनल्टी म्हणजे बऱ्याच वेळा लॉटरी असते. त्यामुळे आम्हाला शूटआऊट टाळायचा होता. त्याचदृष्टिने प्रयत्न होता.

एक चेंडू नेटमध्ये जाऊन गोल झाला आणि आम्ही जिंकलो याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया हिरो इंडियन सुपर लिग (आयएसल) विजेत्या बेंगळुरू एफसीचे प्रशिक्षक कार्लेस कुआद्रात यांनी व्यक्त केली.

मुंबईत रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात बेंगळुरू एफसीने एफसी गोवा संघावर 1-0 अशी मात केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत कुआद्रात पुढे म्हणाले की, आयएसएल अंतिम सामन्यांतील 14 पैकी सात गोल सेट-पिसचे आहेत. यावरून असे गोल किती महत्त्वाचे असतात हे दिसून येते. आम्ही त्यासाठी बराच सराव केला होता.

बेंगळुरूने गटसाखळीत अव्वल स्थान मिळविले होते. अशी कामगिरी केलेला आणि अंतिम सामनाही जिंकलेला बेंगळुरू एफसी हा आयएसएल इतिहासातील पहिला संघ ठरला. गेल्या मोसमात पदार्पण केल्यानंतर बेंगळुरूने साखळीत अव्वल स्थान मिळविले होते, पण त्यांना अंतिम फेरीत चेन्नईयीन एफसीकडून पराभूत व्हावे लागले होते. या पराभवातून त्यांनी धडे घेतले.

या पराभवानंतर स्पेनच्या अल्बर्ट रोका यांनी क्लबचा निरोप घेतला. त्यानंतर कुआद्रात यांच्या मार्गदर्शनाखाली सनसनाटी पुनरागमन साकार झाले. कुआद्रात म्हणाले की, रोका यांनी मायदेशी परत जाऊन कुटुंबियांच्या सहवासात राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर प्रशिक्षकपदी मी काम करू शकेन असे खेळाडू म्हणत होते. मी ही जबाबदारी स्विकारली तेव्हा खेळाडूंना कल्पना होती की मी जे काही सांगेन ते करावे लागेल. पहिल्या दिवसापासून आम्ही गेल्या मोसमात केलेल्या काही गोष्टी बदलत होतो. आम्ही आमच्या योजनेवर विश्वास ठेवला असे नमूद करावे लागेल.

स्पेनच्याच कुआद्रात यांनी आव्हानात्मक अंतिम फेरीबद्दल गोव्याचे कौतूक केले. त्याचवेळी कॉर्नरवर राहुल भेकेने केलेला निर्णायक गोल ज्या खडतर सरावातून साकार झाला त्याचाही उल्लेख केला.

अल्बर्ट सेरॅन याला वगळण्याचा धोकादायक निर्णय बेंगळुरूने घेतला आणि तो यशस्वी ठरविला. याविषयी कुआद्रात म्हणाले की, अल्बर्ट आमच्यासाठी आवश्यक राहिला होता. त्यामुळे बदल करण्यात धोका होता, पण राहुल भेके, निशू कुमार आणि हरमनज्योत खाब्रा अशा भारतीय बचावपटूंनी केलेल्या खेळाविषयी मी आनंदी आहे. गोव्याला जास्त संधी मिळत नव्हत्या. या मोसमातील आधीच्या सामन्यांत फेरॅन कोरोमीनास याला मिळाली तेवढी मोकळीक यावेळी नव्हती.

कर्णधार सुनील छेत्रीने रोका यांच्या तुलनेत कुआद्रात यांनी केलेल्या बदलांमुळे आणखी प्रगती झाल्याचे नमूद केले.

गोव्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांनी आपला संघ चांगला खेळल्याचे आणि केवळ अतिरीक्त वेळेतील पहिल्या सत्रातील अहमद जाहौह याच्या रेड कार्डमुळे सामन्याचे पारडे फिरल्याचे नमूद केले.

ते म्हणाले की, अतिरीक्त वेळेत आमचा एक खेळाडू कमी होणे हाच क्षण निर्णायक ठरला. सामना खुप चुरशीचा झाला. एखादी छोटीशी गोष्ट निर्णायक ठरणार होती. रेड कार्डमुळे आमची बाजू कमकुवत झाली.

बेंगळुरूचा संघ आमच्यापेक्षा सरस नव्हता, तर आम्ही सुद्धा बेंगळुरूपेक्षा सरस नव्हतो. अटीतटीचा सामन झाला. त्यात हरणे खूप कठोर ठरले. बेंगळुरू आमच्या नैसर्गिक खेळाला रोखू शकले नव्हते. आम्ही अपेक्षेनुसार खेळ केला. आम्ही चांगला खेळ केला. खेळाडूंनी केलेल्या प्रयत्नांचा मला फार अभिमान वाटतो. आम्ही एका भक्कम संघाविरुद्ध खेळत होतो. कुणाचाही विजय होऊ शकला असता, असेही लॉबेरा यांनी सांगितले.

You might also like