हैदराबाद, दिनांक 13 फेब्रुवारी : हिरो इंडियन सुपर लिगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात हैदराबाद एफसीला जमशेदपूर एफसीने 1-1 असे बरोबरीत रोखले. स्ट्रायकर सुमित पासी याने भरपाई वेळेत जमशेदपूरला बरोबरी साधून दिली. या निकालामुळे हैदराबादची पहिल्या क्लीन शीटची व दुसऱ्या विजयाची प्रतिक्षा आणखी लांबली.
नेस्टर गॉर्डीलोने पूर्वार्धात हैदराबादचे खाते उघडले होते. मध्यंतरापर्यंत हैदराबादने ही आघाडी कायम राखली होती, पण सुमितने त्यांची निराशा केली.
भरपाई वेळेतील तिसऱ्या मिनिटाला सुमितने ही गोल केला. न्यो अकोस्टा याने घेलेल्या फ्री-किकवर त्याने अप्रतिम हेडींग करीत चेंडूला नेटची दिशा दिली.
त्याआधी हैदराबादने घरच्या मैदानावर खाते उघडण्याची शर्यत जिंकली. 36व्या मिनिटाला मार्को स्टॅन्कोविचने मार्सेलिनियोच्या दिशेने मारलेला चेंडू जमशेदपूरचा बचावपटू जॉयनर लॉरेन्को याने थोपविला, पण तो पूर्ण नियंत्रण मिळवू शकला नाही. याचा फायदा घेत नेस्टरने डाव्या पायाने चपळाईने फटका मारला.
सहाव्या मोसमात बाद फेरी गाठण्याच्या दोन्ही संघांच्या आशा यापूर्वीच संपुष्टात आल्या होत्या. चाहत्यांना थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून त्यांना विजयाची गरज होती, पण यात दोन्ही संघ अपयशी ठरले.
हैदराबादला 17 सामन्यांत चौथी बरोबरी पत्करावी लागली असून त्यांना एकमेव विजय मिळाला असून 12 पराभव पत्करावे लागले आहेत. त्यांचे सात गुण झाले. त्यांचे शेवटचे स्थान कायम राहिले. जमशेदपूरचेही सातवे स्थान कायम राहिले. 17 सामन्यांत चार विजय, सहा बरोबरी व सात पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 18 गुण आहेत.
बाद फेरीतील चार पैकी तीन संघ नक्की झाले आहेत. एफसी गोवा (17 सामन्यांतून 36), एटीके एफसी (16 सामन्यांतून 33), बेंगळुरू एफसी (16 सामन्यांतून 29) यांची आगेकूच नक्की आहे. चौथ्या स्थानासाठी मुंबई सिटी एफसी (17 सामन्यांतून 26), चेन्नईयीन एफसी (15 सामन्यांतून 22) आणि ओदीशा एफसी (16 सामन्यांतून 21) यांच्यात चुरस आहे.