मेलबर्न येथे २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची आज घोषणा करण्यात आली. पहिल्या कसोटी सामन्याच्या संघात चार बदल भारतीय संघाने केले आहेत. मात्र पहिल्या सामन्यात फलंदाजी ढेपाळली असूनही केएल राहुलला दुसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने देखील राहुलला संघात स्थान न मिळाल्याचे पाहून दु:ख होत असल्याचे मत मांडले आहे. कैफने एका मुलाखतीत बोलताना हे मत व्यक्त केले आहे.
राहुलला संधी मिळायला हवी होती, मात्र संघ संतुलित
संघनिवडीवर भाष्य करताना कैफ म्हणाला, “संघ संतुलित वाटतो आहे. रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाल्याने संघाला फायदा होईल. तो सध्या चांगल्या लयीत आहे, आणि त्याची फलंदाजी देखील पूर्वीपेक्षा सुधारली आहे. शुबमन गिल देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सगळेच त्याचे कौतुक करत आहे. एकूणच संतुलित संघ दिसतो आहे. मात्र केएल राहुलला सारख्या खेळाडूला तुम्ही संघाबाहेर नाही ठेवू शकत. त्याला संघात स्थान न मिळाल्याचे पाहून दु:ख होते.”
तीन फिरकीपटू संघात असल्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियन फलंदाज नेहमीच फिरकीविरुद्ध अडखळताना दिसले आहेत. मागच्या सामन्यात देखील अश्विन भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज होता. तसेच रहाणेला जडेजाच्या संघात येण्याने मदत मिळेल.” रहाणेने चौथ्या क्रमांकावरच फलंदाजी करावी, असेही कैफने सांगितले.
मागील सामन्यात गुलाबी चेंडूमुळे भारतीय संघाचे नुकसान झाले का असे विचारले असता कैफ म्हणाला, “गुलाबी चेंडू निश्चितच अधिक स्विंग होतो. तसेच अॅडलेडची खेळपट्टी देखील आव्हानात्मक होती. मात्र पुढील सामना लाल चेंडूने खेळला जाणार असल्याने भारतीय फलंदाजांना फायदा होईल. तसेच मेलबर्नची खेळपट्टी देखील फलंदाजांना अधिक अनुकूल असेल. त्यामुळे भारतीय संघासाठी ही पुनरागमन करण्याची संधी आहे. या सामन्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे.”