जगातील दुसरी सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असलेल्या २०२० युरो कपची ११ जुलै रोजी समाप्ती झाली. लंडन येथील वेंबली स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआउटमध्ये लागला. ज्यामध्ये इटलीने ३-२ अशी सरशी साधली. इटलीने १९६८ नंतर प्रथमच युरो कप जिंकला. अंतिम सामन्याचा नायक ठरलेला इटलीचा गोलरक्षक जियानलुची डोनारोमा स्पर्धेचा मानकरी ठरला.
इंग्लंडची दुसऱ्या मिनिटाला आघाडी
वेंबली स्टेडियमवर उपस्थित असलेल्या तब्बल ६० हजार प्रेक्षकांच्या साथीने या थरारक सुरुवात झाली. केवळ दुसऱ्याच मिनीटाला इंग्लंडने अप्रतिम चाल रचत इटलीच्या हाफमध्ये आक्रमण केले. ट्रिपीएरच्या अचूक पासवर ल्युक शॉने कोणतीही चूक न करता संघाला आघाडीवर नेले. हा युरो कप अंतिम सामन्याच्या इतिहासात केला गेलेला सर्वात वेगवान गोल ठरला. पहिल्या सत्रापर्यंत ही आघाडी कायम राहिली.
इटलीने केली बरोबरी
संपूर्ण युरो २०२० मध्ये इटलीने दुसऱ्या सत्रामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. अशीच कामगिरी त्यांनी या अंतिम सामन्यातही केली. सतत आक्रमण करून इटलीने इंग्लंडच्या बचावाची परिक्षा पाहिली. अखेरीस, संघाचा सर्वात अनुभवी बचावपटू लिओनार्दो बनुची याने ६७ व्या मिनिटाला इंग्लंडचा गोलरक्षक पिकफोर्ड याला चकवून संघाला बरोबरी साधून दिली. उर्वरित वेळेत दोन्ही संघ गोल करण्यात अपयशी ठरल्याने सामना एक्स्ट्रा टाइममध्ये गेला.
पेनल्टी शूटआउटचा थरार
एक्स्ट्रा टाईममध्ये १-१ बरोबरी राहिल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये सामन्याचा निकाल लागला. इटलीतर्फ वेराडी व इंग्लंडतर्फ कर्णधार हॅरी केन यांनी पेनल्टी सत्कारणी लावली. इटलीसाठी बेलोटी अपयशी ठरला तर, इंग्लंडसाठी मॅकग्वायरने २-१ अशी आघाडी मिळवून दिली. बोनुचीने तिसरी पेनल्टी साधली तर, रॅशफोर्ड इंग्लंडसाठी पेनल्टीवर यश मिळवू शकला नाही. इटलीसाठी बेर्नारडेशीने पेनल्टी साधल्यानंतर इंग्लंडकडून सॅन्चो अपयशी ठरला. इटलीसाठीची अखेरची पेनल्टी जॉरजीनो जाळ्यात ढकलू न शकल्याने सामना सडन-डेथमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली. परंतु, इंग्लंडची अखेरची पेनल्टी साको साधू शकला नाही आणि इटलीने ३-२ अशा फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम सामना गमावल्यानंतर रडू लागला नेमार, मैदानातील वैर विसरुन मेस्सीने दिली गळाभेट
कोपा अमेरिका: अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा ब्राजीलवर १-०ने विजय, २८ वर्षांच्या प्रतिक्षेवर अंकुश
जिद्द असावी तर अशी! पायातून रक्त वाहत असतानाही मेस्सीने संघाला मिळवून दिले अंतिम फेरीचे तिकीट