पुणे। मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या पुणे टप्प्यात आज दोन अंतिम सामने रंगले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात दी बिशॉप स्कूलने, तर १६ वर्षांखालील मुलींच्या गटात जय हिंद स्कूल संघाने बाजी मारली. हे दोन्ही संघ आता मुंबईत होणाऱ्या प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत.
१४ वर्षांखालील मुलांचा अंतिम सामना एकतर्फी झाला. दी बिशॉप स्कूल संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १८६ धावा केल्या. नील गांधीने नाबाद ७६ आणि इशान लोयाने २३ धावांची खेळी करताना संघाच्या धावसंख्येत मोठा हातभार लावला.
शेठ दगदुरम कटारिया स्कूल संघासाठी हे लक्ष्य खडतर नव्हते, परंतु दी बिशॉप स्कूलच्या गोलंदाजांसमोर त्यांनी शरणागती पत्करली. कटारिया स्कूल संपूर्व संघ २८.३ षटकांत ८४ धावांवर तंबूत पाठवून दी बिशॉप स्कूलने १०२ धावांनी विजय मिळवला. अर्धशतकी खेळी करणार्या नीलने २ विकेट्स घेत अष्टपैलू चमक दाखवली.
१६ वर्षांखालील मुलींच्या गटात जय हिंद स्कूल संघाने जेतेपदाच्या लढतीत प्रोडीगी पब्लिक स्कूल संघावर ३० धावांनी विजय मिळवला. संस्कृती बडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जय हिंद स्कूल संघाने हा विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना संस्कृती आणि नम्रता कापसे यांनी अनुक्रमे ३६ व २२ धावा करून संघाला २५ षटकांत ५ बाद १४१ धावा करून दिल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या प्रोडीगी पब्लिक स्कूल संघाला २०.३ षटकांत सर्वबाद १११ धावा करता आल्या. संस्कृतीने चार विकेट्स घेत जय हिंदच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
संक्षिप्त धावफलक।
१४ वर्षांखालील मुले ( अंतिम सामना)
दी बिशॉप स्कूल ( कॅम्प) ८ बाद १८६ ( नील गांधी ७६*, इशान लोया २३) वि. वि. शेठ दगदुरम कटारिया स्कूल २८.३ षटकांत सर्वबाद ८४ धावा, १०२ धावांनी विजयी; सामनावीर – नील गांधी ( नाबाद ७६ धावा आणि २ विकेट्स)
१६ वर्षांखालील मुली ( अंतिम सामना)।
जय हिंद स्कूल ( पिंपरी) २५ षटकांत ५ बाद १४१ ( संस्कृती बडे ३६, नम्रता कापसे २२) वि. वि. प्रोडीगी पब्लिक स्कूल २०.३ षटकांत सर्वबाद १११ धावा, ३० धावांनी विजयी; सर्वोत्तम खेळाडू – संस्कृती बडे ( ३६ धावा आणि ४ विकेट्स).