जयदत्त क्रीडा मंडळ, एस. एस. जी. फाऊंडेशन, महाराष्ट्र स्पोर्ट्स, जागृती सेवा मंडळ, अशोक मंडळ, ओम बजरांग बली क्रीडा मंडळ यांनी मुंबई शारीरिक मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित “ जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमार गटात पहिल्या विजयाची नोंद केली.
वडाळा- मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या सामन्यात जयदत्ताने पहिल्या डावातील १०-१९ अशा पिछाडीवरून दिलखुशचा संघर्षमय प्रतिकार ४१-३७ असा मोडून काढला. यश पवार, गुरुनाथ पन्हाळकर यांनी दुसऱ्या डावात आपल्या खेळात अधिक आक्रमता आणत संघाला विजय मिळवून दिला. रत्नेश पिंगळे, राहुल यादव यांनी पहिल्या डावात दिलखूषला महत्वपूर्ण आघाडी मिळवून देण्यात यश मिळविले होते. पण दुसऱ्या डावात त्यांची मात्रा चालली नाही, म्हणून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ओमकार घोटे, आकाश चौहान यांच्या झंझावाती खेळाने एस एस जी फाऊंडेशनने जय बजरंग मंडळाला ४५-४२ असे चकविले. पूर्वार्धात २९-१४अशी आघाडी घेणाऱ्या एस एस जी ला उत्तरार्धात जय बजरंगच्या प्रथमेश कांबळे, कार्तिक घायकोळी यांनी चांगलेच झुंजविले.
महाराष्ट्र स्पोर्टसने चुरशीच्या लढतीत स्मित स्पोर्ट्सचा ३३-३० असा पराभव केला. धीरज राणे, विघ्नेश चव्हाण यांच्या चतुरस्त्र खेळामुळे महाराष्ट्र स्पोर्टसने मध्यांतराला १८-०७ अशी आश्वासक आघाडी घेतली होती. पण मध्यांतरानंतर स्मिता स्पोर्ट्सच्या प्रिन्स जैसवाल, शैलेश यादव यांनी आपला खेळ गतिमान करीत सामन्यात रंगत आणली. पण विजय काय त्यांना मिळाला नाही.
जागृतीने प्रेरणाचे आव्हान २८-२१ असे संपवित दुसरी फेरी गाठली. विश्रांतीला जागृतीकडे १४-१०अशी महत्वाची आघाडी होती. ऑडिन डिसोझा, ओमकार तरळ, तर प्रेरणाकडून प्रथमेश तांबे, मितेश भुवड यांनी उत्तम खेळ. अशोक मंडळाने विजय बजरंग क्रीडा मंडळाचा ४१-१२ असा सहज पाडाव केला. संतोष ठाकूर, उत्कर्ष कानके यांना या मोठ्या विजयाचे श्रेय जाते.
ओम बजरंगबली मंडळाने हिंदमाता या बलाढ्य संघाला ५९-४६ असे नमवित आगेकूच केली. ऋतुराज कर्वे, ऋषिकेश कदम यांनी उत्कृष्ट खेळ करीत हिंदमाताला मध्यांतराला ३०-२०अशी छोटी आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना राखता आली नाही. मध्यांतरानंतर प्रल्हाद किंजवे, प्रथमेश गुरव यांनी आपला खेळ उंचावत बजरंगबलीला दुसरी फेरी गाठून दिली.
कुमार गटाचे इतर निकाल संक्षिप्त :- १)विहंग क्रीडा मंडळ विजयी विरुद्ध जय भारत सेवा मंडळ (३६-२१); २)ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ वि वि कृष्णामाई क्रीडा मंडळ (३९-१८); ३)वीर संताजी क्रीडा मंडळ वि वि पिंपळेश्वर क्रीडा मंडळ (५४-२२); ४) विजय नवनाथ मंडळ वि वि गणेश स्पोर्ट्स क्लब (४५-२०).