भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची कारकीर्द ही एखाद्या परिकथेप्राणे वाटावी, इतकी परिपूर्ण आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत कित्येक विक्रम आपल्या नावे केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा, सर्वाधिक सामने, शंभर शतके असे अनेक विक्रम त्याच्या नावे आजही अबाधित आहेत. त्याचे हे विक्रम तोडणे, भल्याभल्या महारथींना आजवर जमलेले नाही.
मात्र आता सचिन तेंडुलकरचा एक महत्वाचा विक्रम धोक्यात आला आहे. विद्यमान क्रिकेटमधील एक खेळाडू या विक्रमाच्या जवळ पोहोचल्याने धोक्याची घंटी वाजली आहे, असे म्हणायला हरकत नाही. हा खेळाडू म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून, इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स एंडरसन आहे. एंडरसन सचिनच्या एका विक्रमाच्या नजीक पोहोचला आहे.
‘हा’ विक्रम आहे धोक्यात
जेम्स एंडरसन हा इंग्लंडच्या दिग्गज वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. येत्या १० जुलैला तो ३९ वर्षांचा होईल. मात्र त्याच्या गोलंदाजीची धार अजूनही कमी झाली नाहिये. त्यामुळे आजही तो इंग्लंडच्या कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. इंग्लंडच्या आगामी क्रिकेट हंगामात त्यामुळेच सातही कसोटी सामन्यात तो महत्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येईल.
मात्र याच सामन्यांदरम्यान तो सचिन तेंडुलकरचा मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम मोडून काढू शकतो. सचिनने खेळलेल्या एकूण २०० आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांपैकी ९४ सामने त्याने मायदेशात म्हणजे भारतात खेळले आहेत. हा एक विश्वविक्रम आहे. मात्र आता इंग्लंडने आगामी सातही कसोटी सामन्यात जेम्स एंडरसनला संधी दिली तर हा विक्रम मोडल्या जाऊ शकतो. एंडरसनने आत्तापर्यंत मायदेशात म्हणजे इंग्लंडमध्ये ८९ कसोटी सामने खेळले आहेत. मात्र जर येत्या हंगामात त्याने सहा कसोटी सामने खेळले तर सचिनचा हा विश्वविक्रम एंडरसनच्या नावे होईल.
इतरही विक्रम एंडरसनच्या रडारवर
इंग्लंडचा संघ येत्या हंगामात न्यूझीलंड आणि भारत या दोन संघांविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. सर्वप्रथम ते न्यूझीलंडशी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आमने-सामने येतील. त्यानंतर भारतीय संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. या मालिकांमधून एंडरसनला इतरही वैयक्तिक विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. एंडरसन या मालिकांमधून इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम नावे करू शकतो. हा विक्रम सध्या १६१ सामन्यांसह माजी कर्णधार अॅलिस्टर कुकच्या नावे आहे. याशिवाय १६ बळी घेतल्यास मायदेशात ४०० बळींचा टप्पा ओलांडण्याची देखील एंडरसनला संधी आहे. यापूर्वी हा कारनामा केवळ मुथय्या मुरलीधरनने केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीचा सल्ला देणाऱ्या ट्रोलरची माहीकडून बोलती बंद; म्हणाला आणखी काही टिप्स सर
चाहत्यांसाठी खुशखबर, ‘ही’ अट पूर्ण केल्यास आयपीएल सामन्यांना मैदानात मिळणार प्रवेश
WTC Final: रोहित-शुबमनची सलामी जोडी भारतासाठी चिंतेचा विषय, माजी खेळाडूचे परखड मत