लीड्स येथील प्रसिद्ध हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरी कसोटी खेळली जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने नियमित अंतराने तीन बळी मिळवत भारतीय संघाची वाताहत केली. गोलंदाजीत शानदार फॉर्ममध्ये असलेल्या अँडरसनने या सामन्यात उतरताच एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली होती.
अँडरसनने सोडले द्रविडला पाठीमागे
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात अनुभवी खेळाडू असलेला जेम्स अँडरसन लीड्समध्ये आपल्या १६५ व्या कसोटी सामन्यात उतरला. यासोबतच त्याने भारताचा माजी कर्णधार व ‘द वॉल’ नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडला मागे सोडले. द्रविडने आपल्या कारकीर्दीत १६४ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या यादीमध्ये आता अँडरसन पाचव्या क्रमांकावर आला. अँडरसन इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी खेळणारा क्रिकेटपटू आहे.
या खेळाडूंच्या नावे सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्या नावे आहे. सचिनने आपल्या २४ वर्षाच्या कारकिर्दीत २०० कसोटी सामने खेळले होते. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉंटिंग व स्टीव्ह वॉ यांचा क्रमांक लागतो. त्यांनी प्रत्येकी १६८ सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केलेले. या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस असून त्याने १६६ कसोटी सामने खेळले होते.
क्रिकेट इतिहासातील सर्वात्तम वेगवान गोलंदाज
जेम्स अँडरसन याला आकडेवारीचा विचार केल्यास कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हटले जाते. त्याने १६५ सामन्यांमध्ये तब्बल ६२९ बळी मिळवले आहेत. या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी ऑफस्पिनर मुथय्या मुरलीधरन (८०० बळी) व दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न (७०८) आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/engvsind-3rd-test-1st-day-live-james-anderso-takes-kl-rahul-and-cheteshwar-pujara-wicket/
खळबळजनक खुलासा! लॉर्ड्सच्या लॉन्ग रूममध्ये भिडले होते कोहली अन् रूट, कारणही होते मोठे
भारतीय क्रिकेटर मंधाना आहे कसोटी क्रिकेटची चाहती, पाहायला आवडते कोहली-अँडरसनमधील वैर