आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकापासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना अनपेक्षितरीत्या अनिर्णित राहिल्यानंतर उभय संघ दुसऱ्या सामन्यासाठी तयार झाले आहेत. तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाडूंची नवी वैयक्तिक कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या क्रमवारीत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा फायदा झाला असून, तो पुन्हा गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये सामील झाला आहे.
नव्या क्रमवारीत बुमराहची मोठी मजल
मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने शानदार गोलंदाजी करत भारताला सामन्यात आघाडीवर नेले. त्याने पहिल्या डावात ४६ धावा देऊन ४ आणि दुसऱ्या डावात ६४ धावा देत ५ बळी आपल्या नावे केले. या ९ बळींमूळे बुमराहला मोठा फायदा झाला. या कामगिरीमुळे बुमराहने तब्बल १० स्थानांची हनुमान उडी घेत नववा क्रमांक मिळवला. बुमराह जवळपास दीड वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे.
भारतीय कर्णधाराला झाले नुकसान
कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहलीला एका स्थानाचे नुकसान झाले असून, तो पाचव्या क्रमांकावर घसरला. अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा व रिषभ पंत हे अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर कायम आहेत. या व्यतिरिक्त उपकर्णधार अजिंक्य रहाणे एक स्थान घसरून १४ व्या क्रमांकावर पोहोचला.
इंग्लिश खेळाडूंना झाला फायदा
नॉटिंघम कसोटीत पहिल्या डावात अर्धशतक व दुसऱ्या डावात शतक झळकावणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला या क्रमवारीमध्ये एका स्थानाचा फायदा झाला व तो विराट कोहलीला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला. याच सामन्यात इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने चार बळी घेण्याची किमया केली होती. त्याला याचा फायदा झाला. अँडरसन एक स्थान पुढे येत सातव्या क्रमांकावर पोहोचला. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानी कायम आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-इंग्लंड दोन्ही संघांना लॉर्ड्स कसोटीपूर्वी बसले जबरदस्त धक्के, ‘हे’ वेगवान गोलंदाज झाले जखमी
सलाम तुमच्या कामगिरीला! १९८३ च्या विश्वचषकात भारतासाठी नायक ठरलेले ‘यशपाल शर्मा’
क्रिकेटसाठी ११ ऑगस्ट हा दिवस कायमचं विशेष ठरला, जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व