गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली दुबईमध्ये इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचे विजेतेपद पटकावले. पण, त्यावेळी चेन्नई सुपर किंग्स संघाने सेलिब्रेशन केले नव्हते. कारण संघाचा कर्णधार धोनी लगेचच टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेसाठी भारतीय संघात मार्गदर्शक म्हणून सामील झाला होता. हा टी२० विश्वचषक संपल्यावर धोनी भारतात परत आला. यानंतर शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) चेन्नईने एक खास कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील उपस्थित होते. त्यांनी यावेळी धोनीचे कौतुक केले.
धोनीने २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. त्यानंतर तो पहिल्यांदाच टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाबरोबर दिसून आला. पण, यंदा तो खेळाडू किंवा कर्णधार म्हणून नाही, तर मार्गदर्शकाच्या भूमीकेत दिसला. त्याच्या या भूमीकेबाबत देखील जय शाह यांनी भाष्य केले.
त्यांनी सांगितले की ‘मी एमएसला सांगितले की, भारताला तुझी गरज आहे. भारताला तुझ्या पाठिंब्याची आणि तुझ्या खेळाबद्दलच्या ज्ञानाची गरज आहे. त्यानंतर तो हो म्हणाला. पण, तो म्हणाला, की तो त्याच्या सेवेसाठी एकही रुपया घेणार नाही.’
याबरोबरच या कार्यक्रमात धोनी म्हणाला की तो कदाचीत चेन्नईमध्येच त्याचा अखेरचा टी२० सामना खेळणार आहे. यावरुन असा कयास लावला जात आहे की आयपीएल २०२२ हंगामासाठी चेन्नई धोनीला कायम करणार आहेत. याबाबत देखील जय शाह यांनी बोलताना मोठी माहिती दिली. त्यांनी आयपीएल २०२२ हंगाम भारतातच होणार असल्याचे सांगितले.
जय शाह म्हणाले, ‘सीएसके चेपॉकवर (एमए चिदंबरम स्टेडियम) लवकरच सामना खेळेल. १५ वा आयपीएल हंगाम भारतात होणार आहे. आता त्याआधी मोठा आयपीएल लिलाव होईल, त्यावेळी आपल्याला नवे संयोजन कसे असेल, हे पाहायला मिळेल.’
याच कार्यक्रमात धोनी म्हणला की, ‘मी नेहमीच माझ्या क्रिकेटबद्दल योजना आखल्या आहेत. मी माझा अखेरचा मायदेशातील आंतरराष्ट्रीय सामना रांचीमध्ये खेळलो. माझा अखेरचा टी२० सामना चेन्नईमध्ये असेल, मग तो पुढीलवर्षी असो किंवा ५ वर्षांनी, आपल्याला हे माहित नाही.’
आयपीएल २०२२ हंगामाआधी खेळाडूंचा मोठा लिलाव होणार आहे. तसेच या हंगामात अहमदाबाद आणि लखनऊ हे २ नवे संघ स्पर्धेत सामील होत आहेत. या हंगामासाठी संघांना ४ खेळाडूंना संघात कायम ठेवता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अभूतपूर्व कामगिरी! एकाच डावात १० बळी घेत आफ्रिकेचा अष्टपैलू आला प्रसिद्धीझोतात
टी२० मालिकेनंतर ‘हे’ दोघे करणार दक्षिण आफ्रिकेला प्रयाण; शार्दुलचाही होऊ शकतो समावेश
ईडन गार्डन्सवर भारतीय संघ आहे सरस! अशी राहिली आहे कामगिरी