श्रीलंका व इंग्लंड संघादरम्यान गॉल येथे 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. सामन्याचा तिसरा दिवस गाजवला तो इंग्लंडचा कर्णधार जो रूट व श्रीलंकेचा फिरकीपटू लसिथ एम्बुलडेनियाने. दोघांनी आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करत क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या 381 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडच्या डावात नियमित अंतरावर फलंदाज बाद होत होते. मात्र अशा संकटमय परिस्थितीत देखील कर्णधार रूटने 181 धावांची शानदार खेळी केली. रूटच्या खेळीमुळेच इंग्लंडला श्रीलंकेच्या धावसंख्येच्या जवळ पोहोचण्यात यश मिळाले.
रूट आपले द्विशतक साजरे करणार असे वाटत असतानाच दिवसातील शेवटच्या षटकात तो नाट्यमयरित्या धावबाद झाला. रुटने 309 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 186 धावांची शानदार खेळी केली. श्रीलंकेसाठी या सामन्यात एम्बुलडेनिया एक नवा स्टार बनून पुढे आला आहे. एम्बुलडेनिया 41 षटकात 132 धावा देत तब्बल 7 बळी मिळवले.
दरम्यान तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 9 गडी गमावत 339 धावा केलेल्या आहेत. श्रीलंकेच्या 381 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंड अजूनही 42 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्याचा चौथा दिवस अतिशय महत्त्वाचा असून जो संघ या दिवशी उत्तम कामगिरी करेल त्याचा सामन्यावर दबदबा निर्माण होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
राहुल द्रविड यांनी पुन्हा एकदा सिद्ध केला मनाचा मोठेपणा; युवा खेळाडूंच्या यशाचे श्रेय नाकारत म्हणाले