२००७ विश्वचषकाचा हिरो थेट रस्त्यावर उतरुन लोकांना करतोय मदत

कोरोना व्हायरसमुळे जगभरात सर्वकाही लाॅकडाऊन होत आहे. अगदी मोठे-मोठे खेळाडूही घरातच वेळ घालवत आहे. असे असले तरी एक माजी क्रिकेटर असा आहे जो सध्या थेट रस्त्यावर उतरुन कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत लोकांची मदत करत आहे.

तो क्रिकेटर अर्थातच जोगिंदर शर्मा. २००७ क्रिकेट विश्वचषकात भारताकडून फायनलमध्ये शेवटचे षटक टाकणारा व शानदार विजय मिळवुन देणारा हाच तो जोगिंदर शर्मा.

जोगिंदर सध्या हरियाणा पोलिसांत डीवायएसपी पदावर आहे व लोकांनी घरात रहाणे, यासाठी तो सध्या मैदानावर उतरला आहे. लोकांनी घरात रहाणे हाच यावर एकमेव उपाय असल्याचं तो सांगत आहे.

“आम्हाला सहकार्य करा. आपण सगळे मिळून या कोरोनाचा नायनाट करु. बाहेर पडू नका, ” असेही तो ट्विटरच्या माध्यमातून सांगत आहे. (Joginder Sharma joins battle against coronavirus)

१३ वर्षांपूर्वी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला वाहिला टी२० विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 धावांनी पराभूत करत टी20 चे विश्वविजेतेपद मिळवले होते.

या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती, तर भारताला 1 विकेटची. त्यावेळी भारताचा कर्णधार एमएस धोनीने जोगिंदर शर्माकडे शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला.

या षटकात जोगिंदरने पहिल्याच दोन चेंडूत 7 धावा दिल्या. त्यामुळे पाकिस्तानला जिंकण्यासाठी 4 चेंडूत 6 धावा असे समीकरण झाले होते आणि पाकिस्तानकडून फलंदाजी करत होता मिस्बाह उल हक.

यावेळी जोगिंदरने तिसरा चेंडू लेंथमध्ये बदल करत आणि कमी गतीने टाकला आणि 43 धावांवर खेळणाऱ्या मिस्बाहने त्यावर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण फाइन लेगला उभ्या असणाऱ्या एस श्रीसंथने त्याचा झेल घेतला.

या विकेटसह भारताने विश्वचषकही जिंकला. या षटकानंतर जोगिंदर करोडो भारतीयांसाठी हिरो ठरला.

 

पण जोगिंदरसाठी मात्र हा सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याने भारताकडून सामना खेळला नाही. या विश्वचषकानंतर तो हरियाणामध्ये पोलिस खात्यात भर्ती झाला. सध्या तो हरियाणामध्ये पोलिस उपअधीक्षक(डीएसपी) आहे.

असे असले तरी तो २०१८ वर्षापर्यंत क्रिकेट खेळत होता. तसेच त्याने 2007 टी20 विश्वचषकानंतर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून काही सामने खेळले. तसेच तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाकडून खेळला.

त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत भारताकडून 4 वनडे आणि 4 टी20 सामने खेळले. यामध्ये अनुक्रमे त्याने 1 आणि 4 विकेट्स घेतल्या. तसेच त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 77 सामन्यात 5 शतके आणि 10 अर्धशतकांसह 2804 धावा केल्या आणि 297 विकेट्सही घेतल्या आहेत. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने 80 सामन्यात 1040 धावा आणि 115 विकेट्स घेतल्या.

चर्चेतील घडामोडी-

२०१७मध्येच जोफ्रा आर्चरने सांगितलं होतं ३ आठवड्यांचं लाॅकडाऊन

केएल राहुल ५व्या क्रमांकावर एकदम फिट, फक्त एका गोष्टीची आहे कमी

दिलदार पठाण भाऊ! लोकांना दिले एवढे मास्क

शमीला चाहते सध्या गद्दार का म्हणताय? काय आहे कारण?

You might also like