टी२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ च्या सामन्यात मंगळवारी (२५ ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना रंगला. टी२० विश्वचषकमध्ये न्यूझीलंडचा संघ चांगली सुरुवात करू शकला नाही. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना संघाला केवळ १३४ धावा करता आल्या. या धावांचा पाकिस्तानने सहज पाठलाग करत ५ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडचा संघनायक केन विल्यम्सनने कर्णधार म्हणून एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
पाकिस्तान विरुद्धच्या टी२० सामन्यात मैदानात पाय ठेवताच विल्यम्सनने कर्णधार म्हणून मोठी नोंद आपल्या नावे केली आहे. कर्णधार म्हणून त्याचा हा ५० वा टी२० सामना ठरला. पन्नास किंवा त्याहून अधिक टी२० सामने कर्णधार म्हणून खेळलेल्या खेळाडूंच्या यादीत त्याने अरॉन फिंचसोबत संयुक्तपणे पाचवे स्थान पटकावले आहे.
या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल आहे. त्याने ७२ टी२० सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले आहे. त्याखालोखाल इंग्लडचा कर्णधार ओएन मॉर्गन आहे. त्याने ६५ सामन्यात इंग्लडचे नेतृत्व केले आहे. तिसऱ्या स्थानी नेदरलँडचा पोर्टरफिल्ड आहे. त्याने ५६ सामन्यात नेदरलँडचे नेतृत्व केले आहे. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार अझगर अफगाण चौथ्या स्थानी आहे, त्याने ५२ सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करायला गेलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती. संघाने ५.१ षटकात एकही विकेट न गमावता त्यांनी ३६ धावा केल्या होत्या. हारिस रौफने मार्टिल गुप्टिलला (१७) बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले होते. डार्ली मिशेलने २७ धावा केल्या. अखेरच्या षटकात संघाच्या फलंदाजांना वेगवान धावा करता आल्या नाहीत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन १४ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. येथून खेळ पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने वळला. हसन अलीने विल्यमसनला त्याच्याच गोलंदाजीवर धावबाद केले. विल्यमसनने २५ धावा केल्या.
अखेरच्या ७ षटकात संघाला केवळ ४४ धावा करता आल्या. रौफशिवाय शाहीन शाह आफ्रिदी, इमाद वसीम आणि मोहम्मद हाफीजला प्रत्येकी एक विकेट मिळाली. न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकात १३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात शेवटी पाकिस्तानकडून शोएब मलिक आणि असिफ अलीने तूफान फटकेबाजी करत १९ व्या षटकातच संघाला सामना जिंकून दिला.
महत्वाच्या बातम्या-
‘बाबर आझम आणि कंपनी’चा विजयरथ सुसाट, भारतानंतर न्यूझीलंडला ५ विकेट्सने चारली धूळ
शमीच नव्हे ‘या’ दिग्गजालाही करावा लागलेला चाहत्यांच्या रोषाचा सामना, स्वत:ला घरामध्ये केले होते कैद
‘त्या’ अभिमानास्पद घटनेस समर्थन करण्यास डी कॉकचा नकार, बोर्डाकडून मोठ्या कारवाईची शक्यता