शनिवारी (०६ ऑगस्ट) भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात बर्मिंघम येथे कॉमनवेल्थ गेम्स २०२२चा पहिला उपांत्य सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने शेवटच्या षटकात ४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान इंग्लंडची वेगवान गोलंदाज कॅथरिन ब्रँट हिचा तिच्या भावनांवरील संयम सुटल्याचे दिसले. तिने लाईव्ह सामन्यात तिच्याच संघातील खेळाडूवर राग व्यक्त केला. या प्रसंगाची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून अशा वर्तवणूकीसाठी कॅथरिनला आयसीसीकडून दंडही ठोठावण्यात आला आहे.
कॅथरिन ब्रँट तिच्याच संघ सहकारीवर भडकली
इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू आपापसात भिडण्याची घटना भारतीय संघाच्या डावातील १७व्या षटकात घडली. या षटकात इंग्लंडकडून त्यांची दिग्गज वेगवान गोलंदाज कॅथरिन (Katherine Brunt) गोलंदाजी करण्यासठी आली होती. तिच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर भारतीय फलंदाज दिप्ती शर्माने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्या चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क न झाल्याने ती अपयशी ठरली. तिने मारलेल्या फटक्याचा चेंडू हवेतून जात मिड ऑनला उभा असलेल्या क्षेत्ररक्षक फ्रेया केंपच्या हातात गेला.
परंतु केंपला चेंडू पकडण्यात यश आले नाही. आपल्या संघ सहकारीकडून झेल सुटल्यानंतर कॅथरिनचा तिच्या भावनांवरील संयम सुटला. ती भर सामन्यात केंपला रागवायला लागली. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेरात कैद झाला असून क्रिकेटप्रेमी त्यावर व्यक्त होत आहेत.
कॅथरिन ब्रँटला मिळाली शिक्षा
कॅथरिनला तिच्या या वर्तवणूकीसाठी आयसीसीकडून शिक्षा देण्यात आली आहे. ३७ वर्षीय कॅथरिनवर आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.३ चे उल्लंघन करण्याचा आरोप लावण्यात आला आहे, जो खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफशी आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अश्लील भाषेच्या वापराशी संबंधित आहे. कॅथरिनने तिच्यावर लावण्यात आलेले आरोप मान्य केले असल्याने कोणत्याही अधिकृत कारवाईची गरज पडली नाही. मैदानी पंच एलॉइस शेरीडन आणि किम कॉटन, तिसरे पंच क्लेअर पोलोसाक आणि चौथे पंच शिवानी मिश्रा यांनी कॅथरिनवर हे आरोप लावले आहेत.
याबरोबरच, गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत आधीच डिमेरिट पॉईंट मिळालेल्या कॅथरिनला आयसीसीने आणखी एक डिमेरिट पॉईंट दिला आहे. त्यामुळे तिला आता शिस्तभंगाबद्दल अधिक काळजी घ्यावी लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षल पटेल आशिया चषक खेळणार नाही! भारतीय संघाबाबत मोठी बातमी आली समोर
अजून किती छळशील..! आधीच त्रासलेल्या वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा भर मैदानात पंतने मांडला छळ