गोवा| हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात आणखी एक लढत बरोबरीत सुटली असून बुधवारी केरला ब्लास्टर्स एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यात गोलशून्य बरोबरी झाली. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. पूर्वार्धात उभय संघांमध्ये गोलशून्य बरोबरी होती. ती निर्धारीत वेळेतही कायम राहिली.
जमशेदपूरची ही 14 सामन्यांतील सहावी बरोबरी असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण झाले. त्यांनी सरस गोलफरकामुळे ब्लास्टर्सला मागे टाकून सातवे स्थान मिळविले. ब्लास्टर्सलाही 14 सामन्यांत सहावी बरोबरी पत्करावी लागली असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 15 गुण झाले. जमशेदपूरचा उणे 4 (13-17) गोलफरक ब्लास्टर्सच्या उणे 5 (17-22) उणे एकने सरस ठरला.
पूर्वार्धात सहाव्या मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू लालडीलियाना रेंथलेई याने उजवीकडून आगेकूच केली. त्याने बॉक्समध्ये मारलेला चांगला क्रॉस शॉट ब्लास्टर्सचा बचावपटू बाकारी कोने याने अडविला. पुढच्याच मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू रिकी लल्लावमाव्मा याने आगेकूच केली. त्यावेळी ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने पुढे सरसावत दडपण आणले. त्यामुळे रिकीने चेंडू वॅल्सकीसच्या दिशेने मारला. वॅल्सकीस फटका मारेपर्यंत गोम्स मुळ जागी परतला होता आणि त्याने चेंडू हाताने थोपविला. मग बाकारी याने बचावाचे उरलेले काम पूर्ण केले.
20व्या मिनिटाला ब्लास्टर्सला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक साहल अब्दुल समद याने घेतला, पण त्याचा फटका जमशेदपूरचा बचावपटू नरींदर गेहलोत याने रोखला. 30व्या मिनिटाला मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याच्या पासवर स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याचा प्रयत्न फसला. 35व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा स्ट्रायकर गॅरी हूपर याचा गोल अवैध ठरला.
41व्या मिनिटाला हुपरने मारलेल्या फटक्यावर ब्लास्टर्सचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश चकला होता, पण त्याच्या सुदैवाने चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला.
दुसऱ्या सत्रात 52व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा स्ट्रायकर जॉर्डन मरे याने मारलेला चेंडू बारवरून गेला. 56व्या मिनिटाला जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने हेडींगवर निर्माण केलेल्या संधीनंतर स्ट्रायकर जॉन फिट््झगेराल्डने प्रयत्न केला, पण त्याने अगदी जवळून चेंडू मारल्यामुळे गोम्सने तो अडविला. अखेरच्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बदली मध्यरक्षक सैत्यसेन सिंग याने घेतलेल्या कॉर्नरवर समदने मारलेला फटका नेटपलिकडील स्टँडमध्ये गेला.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : नॉर्थईस्ट युनायटेडचा एटीके मोहन बागानला धक्का
आयएसएल २०२०-२१ : चेन्नईयीनने आघाडीवरील मुंबई सिटीला रोखले
आयएसएल २०२०-२१ : ओदिशाविरुद्ध पार्टालूच्या गोलमुळे बेंगळुरूची बरोबरी