fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेलो इंडिया- मुष्टीयुद्ध खेळात आकाश व मितिकाचा विजयी प्रारंभ

पुणे । महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, मितिका गुणेले, संगीता रुमाले या खेळाडूंनी मुष्टीयुध्द खेळात विजयी वाटचाल राखली. आकाश याने १७ वषार्खालील गटातील फीदरवेट विभागात मणिपूरच्या लायशानग्बम सिंग याच्यावर ४-१ अशी मात केली.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. लाईटवेट विभागात महाराष्ट्राच्या लैश्रामसिंग याला मिझोरामच्या लालनुझिरा याच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले.

ही लढत लालनुझिरा याने ५-० अशी जिंकली. ६३ किलो गटात मणिपूरच्या अर्जुन शर्मा याने महाराष्ट्राच्या सोहेल रमझाम याच्यावर मात केली. पंचांनी ही लढत थांबवून अर्जुन याला विजयी घोषित केले.

लाईट मिडलवेट विभागात बिहारच्या केतनकुमार याने महाराष्ट्राच्या अमनदीपसिंग याला हरविले. पंचांनी पहिल्या फेरीतच ही लढत थांबवित केतन याला विजयी घोषित केले.

मुलींच्या लाईटवेट गटात महाराष्ट्राच्या सना गोन्साल्विस हिने आव्हान राखले. तिने मिझोरामच्या रुडी लाल्मिंगुनी हिचा पराभव केला. ६३ किलो विभागात महाराष्ट्राच्या सुप्रिया मिश्रा हिला रुद्र्रिका कुंडु या हरयाणाच्या खेळाडूकडून पुढे चाल मिळाली.

६६ किलो गटात मितिका गुणेले हिने उत्तराखंडच्या लकी राणा हिच्यावर शानदार विजय मिळविला. महाराष्ट्राची हिरल मकवाना हिला मणीपूरच्या सानामाचा चानू हिच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले.

५४ किलो गटात संगीता रुमाले हिने विजयी घोडदौड राखताना मध्यप्रदेशच्या दिव्या पवार हिला ४-१ असे हरविले. ५७ किलो गटात तेजस्विनी जिवरंग हिला पराभव पत्करावा लागला. तिला राजस्थानच्या ज्योती कन्वर हिने ४-१ असे हरविले.

You might also like