पुणे। आघाडी मिळविल्यानंतर फुटबॉलमध्ये वर्चस्व राखण्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंना अपयश आले, त्यामुळेच त्यांना मुलांच्या १७ वर्षाखालील उपांत्य फेरीत पंजाबविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला. पूर्वार्धात महाराष्ट्राने १-० अशी आघाडी घेतली होती.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेत ३९ व्या मिनिटाला विनय कोकंदामुरी याने महाराष्ट्राचे खाते उघडले. या गोलच्या आधारे त्यांनी मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात पंजाबच्या खेळाडूंनी धारदार आक्रमणास अचूकतेची जोड देत विजयश्री खेचून आणली.
४९ व्या मिनिटाला त्यांच्या एस.लोतजेम याने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. पाठोपाठ ६२ व्या मिनिटाला त्यांच्या एस.तरुण याने हेडिंगच्या साहाय्याने सुरेख गोल नोंदविला आणि संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या भरपाई वेळेत पंजाबच्या मंगमिंलुम सिंग्सोन याने संघाचा तिसरा गोल केला.
मुलींच्या १७ वर्षाखालील उपांत्य फेरीत ओडिशा संघाने मणीपूरचा २-१ असा पराभव केला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला दीपाकुमारी हिने ओडिशाचे खाते उघडले. तथापि मणीपूरच्या लैश्राम हिने ४९ व्या मिनिटाला गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. बराच वेळ ही बरोबरी कायम होती. अखेर ८९ व्या मिनिटाला सरिताकुमारी हिने ओडिशाचा विजयी गोल केला.