पुणे। महाराष्ट्राच्या दिया चितळे व स्वस्तिका घोष यांनी टेबल टेनिसमधील पात्रता फेरीत विजय मिळवित १७ वर्षाखालील मुलींमध्ये मुख्य फेरीचे आव्हान राखले. दिया हिने टॉपस्पीन फटक्यांचा उपयोग करीत दिल्लीच्या तिशा कोहली हिच्यावर ११-६, ११-२, ११-१ असा दणदणीत विजय मिळविला. स्वस्तिका हिने दादरा नगर हवेली संघाच्या भूवी चतुवेर्दी हिचा ११-१, ११-१, ११-४ असा धुव्वा उडविला. तिने काऊंटर अॅॅटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. याच वयोगटात महाराष्ट्राच्या समृद्धी कुलकर्णी हिला पश्चिम बंगालच्या पोयमंती बैश्या हिने ११-९, ११-७, ११-८ असे पराभूत केले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या दीपित पाटील याला पश्चिम बंगालच्या तमल बालन याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. बालन याने हा सामना ३-११, ९-११, १४-१२, १२-१०, ११-७ असा रोमहर्षक विजय मिळविला. पहिल्या दोन गेम्स जिंकत दीपित याने झकास सुरुवात केली होती मात्र नंतर बालन याने आक्रमक खेळास अचूकतेची जोड देत विजयश्री खेचून आणली. याच गटात महाराष्ट्राच्या चिन्मय सोमय्या याने अपराजित्व राखताना मैनाक दाल (पश्चिम बंगाल) याच्यावर ९-११, ११-९, ११-२, ५-११, ११-५ अशी मात केली. त्याचा सहकारी देव श्रॉफ यानेही आव्हान राखले. त्याने अंदमान व निकोबारच्या सॅम्युअल अडवानी याचा ११-४, ११-४, ११-८ असा पराभव केला.
मुलांच्या २१ वर्षाखालील गटात अर्निबन घोष या बंगालच्या खेळाडूने महाराष्ट्राच्या सिद्धेश पांडे याला ७-११, १३-११, ६-११, ११-८, ११-९ असे चुरशीच्या लढतीनंतर पराभूत केले.