Loading...

खेलो इंडिया युथ गेम्स: सायकलिंगमध्ये पूजाचा सुवर्ण चौकार

गुवाहाटी। खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात बुधवारी महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी आपला दबदबा कायम राखला. कोल्हापूरच्या पूजा दानोळे हिने सुवर्णपदकाचा चौकार लगावताना वैयक्तिक परस्यूट स्पर्धा जिंकली. साता-याच्या मयूर पवार याने स्प्रिंट प्रकारात बाजी मारताना दुसरे सुवर्णपदक जिंकले. मयुरी लुटे हिला स्प्रिंट प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Loading...

लक्ष्मीबाई राष्ट्रीय शाररीरिक शिक्षण संस्थेच्या वेलोड्रमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आज पूजाचीच चर्चा राहिली. तिने वैयिक्तक चौथे सुवर्णपदक जिंकताना आज २०० मीटर परस्यूट शर्यतीत २ मिनीट ४७.४१५ सेकंद वेळ दिली. या वेळी तिचा वेग ताशी ४३.०१ प्रति कि.मी. इतका होता. स्पर्धेत पूजाने एकूण चार सुवर्ण आणि एक ब्रॉंझ अशी पाच पदके जिंकली. तिने बिसेशोरी चानू या मणिपूरच्या स्पर्धकास (२ मिनीट ५७.२९३ सेकंद) असे सहज मागे टाकले. पूजा आणि बिसेशोरी चानू यांच्या वेळेतील फरक बघता पूजाने शर्यत किती एकतर्फी जिंकली हे स्पष्ट होते. कर्नाटकाची अंकिता राठोड ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.

मुलांच्या २१ वर्षांखालील स्प्रिंट प्रकारात साता-याच्या मयूर पवार याने आपले आशियाई विजेतेपद सार्थकी लावले. आपल्याला स्पर्धक नाही हेच दाखवत त्याने स्प्रिंट प्रकारात वर्चस्व राखले. स्पर्धेतील २०० मीटर अंतराच्या शर्यतीत त्याने तब्बल ६३ कि.मी. प्रतिवेग राखताना अंदमानच्या पॉल कॉलिंगवूडला सहज मागे टाकले. मयूरने ११.३०६ सेकंद अशी वेळ दिली, तर पॉलला ११.५७६ सेकंद अशी वेळ देता आली. पंजाबच्या गुरप्रीतला, स्पर्धकाला अडचणीत आणल्याने अपात्र ठरविण्यात आल्याने केरळचा ए. अभिंदू (११.५७५ सेकंद) ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.

मुलींच्या २१ वर्षांखालील गटातच २०० मीटर स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राच्या मयुरी लुटे हिचे प्रयत्न अपयशी ठरले. आंतरराष्ट्रीय सायकलपटू पश्चिम बंगालच्या त्रियाशा पॉल हिने ही शर्यत सहज जिंकली. तिच्या वेगाचा सामना करताना मयुरी काहीशी दडपणाखाली दिसून आली. त्रियाशाने १२.३६२ सेकंद, तर रौप्यपदक जिंकत मयुरीने १२.५५८ सेकंद अशी वेळ दिली. केरळाची अलिना रेजी (१२.६४७ सेकंद) ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली.

महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. त्यांनी खरंच खूप चांगली कामगिरी केली. त्यांचे कौतुक करायलयाच हवे. आता उद्या अखेरच्या दिवशी देखील आपले सायकलपटू पदके मिळवतिल, असा विश्वास महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षिका दिपाली पाटील यांनी व्यक्त केला.

Loading...
Loading...
You might also like
Loading...