सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 80 धावांनी विजय मिळवल्यानंतर अजिंक्य रहाणेने आपले मन मोकळे केले. या सामन्यातील विजयाचा अर्थही त्याने स्पष्ट केला. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, त्यांच्या संघासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे होते आणि तेही मोठ्या फरकाने. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने सहा बाद 200 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात सनरायझर्सचा डाव 120 धावांवर गुंडाळला. सामन्यानंतर रहाणे म्हणाला की, हा सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. मोठ्या फरकाने जिंकणे महत्त्वाचे होते. आम्हाला या विकेटवर प्रथम गोलंदाजी करायची होती, पण नाणेफेक गमावल्यानंतर आम्हाला प्रथम फलंदाजी करावी लागली.
रहाणे म्हणाला, “दोन विकेट पडल्यावर, आम्ही डाव सावरण्यावर भर दिला. उद्दिष्ट स्पष्ट होते विकेट्स हातात ठेवायच्या, जेणेकरून 11-12व्या षटकांनंतर येणाऱ्या फलंदाजांना मुक्तपणे फटके मारता येतील. आमच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि या सामन्यातूनही आम्हाला बरेच शिकायला मिळेल.”
तो पुढे म्हणाला, “रिंकू आणि व्यंकटेश फलंदाजी करत असताना आमचे लक्ष्य साधारण 30 चेंडूत 50-60 धावा करण्याचे होते. सुरुवातीची 15 षटके संयमाने खेळायची आणि नंतर आक्रमण करायचे, असा आमचा विचार होता. आम्हाला 170-180 हा योग्य स्कोअर वाटत होता, पण रिंकू आणि व्यंकटेशने त्याहून अधिक धावसंख्या उभारली.”
गोलंदाजांच्या कामगिरीचं कौतुक करताना रहाणे म्हणाला, “आमच्याकडे तीन शानदार फिरकीपटू आहेत. दुर्दैवाने मोईन नव्हता, पण सनी (सुनील नारायण) आणि वरुणने प्रभावी गोलंदाजी केली. वैभव आणि हर्षितनेही चांगली कामगिरी बजावली.”
गतविजेता केकेआरने सुरुवातीच्या तीनपैकी दोन सामने गमावल्यानंतर अखेर विजयाचा मार्ग पकडला आहे. आता त्यांचा पुढील सामना मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, सनरायझर्सला सलग तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला असून त्यांचा पुढील सामना रविवारी गुजरात टायटन्ससोबत होईल.