मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला तरी विराटने दादाचा ‘तो’ विक्रम मोडलाच!

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या बासिन रिझर्व स्टेडियमवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात आज(23 फेब्रुवारी) तिसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 144 धावा केल्या आहेत. भारत अजून 39 धावांची पिछाडीवर आहे.

आज या डावात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला 43 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने केवळ 19 धावाच केल्या. तो आज ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. असे असले तरी विराटने आज एक खास विक्रम केला आहे. विराट आता कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सौरव गांगुलीला मागे टाकत सहाव्या क्रमांकावर आला आहे.

विराटच्या कसोटीमध्ये आता 85 सामन्यात 54.30 च्या सरासरीने 7223 धावा झाल्या आहेत. तर गांगुलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 113 सामन्यात 42.17 च्या सरासरीने 7212 धावा केल्या आहेत.

कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यात 15921 धावा केल्या आहेत.

सध्या सुरु असलेल्या भारत – न्यूझीलंड कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 165 धावा केल्या होत्या. तर न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद 348 धावा करत 183 धावांची आघाडी घेतली होती.

कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू – 

15921 – सचिन तेंडूलकर

13288 – राहुल द्रविड

10122 – सुनील गावस्कर

8781 – व्हीव्हीएस लक्ष्मण

8586 – विरेंद्र सेहवाग

7223 – विराट कोहली

7212 – सौरव गांगुली

You might also like