राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर, पुणे विभागाला विजेतेपद; रिशांक देवडिगाच्या हस्ते खेळाडूंचा गौरव

१७ वर्षाखालील मुले/मुली राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे २०१९-२० क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर व चिल्डरन वेल्फेअर सेंटर हायस्कूल, वर्सोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने तर मुलींमध्ये पुणे विभागाने विजेतेपद पटकावले.

मुलींमध्ये अमरावती विभाग विरुद्ध पुणे विभाग यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगला. काहीशी धीमी सुरुवात झाल्यानंतर पुण्याने आक्रमक खेळ करत आघाडी मिळवली. १४-०६ अशी मध्यंतरापर्यत आघाडी पुण्याकडे होती. या लढतीत भूमिका गोरे व मनीषा राठोड यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पुणे विभागाने २९-१४ अशी बाजी मारली. अमरावतीकडून सिद्धी चव्हाण व रुणाली जाधवने चांगला खेळ केला.

मुलांच्या अंतिम फेरीच्या सामन्यांत चांगलीच चुरस बघायला मिळाली. सुरुवातीपासून चुरशीच्या सामन्यांत मध्यंतरापर्यत २२-१८ अशी आघाडी मुंबई विभागाकडे होती. शेवटच्या काही मिनिट शिल्लक असताना कोल्हापूर संघाने आक्रमक खेळ करत सामना बरोबरीत आणला. त्यांनतर बारीकसारीक चुकांचा फटका मुंबई विभागाला बसला. त्याचा फायदा घेत कोल्हापूरने आघाडी घेतली आणि ३९-३६ असा सामना जिंकत विजेतेपद पटकावले.

मुलीच्या तृतीय क्रमांकाच्या लढतीत कोल्हापूर विभागाने मुंबई विभागाचा पराभव केला. तर मुलाच्या तृतीय क्रमांकाच्या लढतीत औरंगाबाद विभागाने लातूर विभागावर विजय मिळवला.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी स्टार कबड्डीपटू रिशांक देवडीगाने प्रमुख उपस्थिती लावली होती. तसेच मुंबई उपनगरचे अध्यक्ष अमोल कीर्तिकर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

संक्षिप्त निकाल
मुले:
विजेते- कोल्हापूर विभाग
उपविजेते- मुंबई विभाग
तृतीय क्रमांक- औरंगाबाद

मुली:
विजेते- पुणे विभाग
उपविजेते- अमरावती विभाग
तृतीय क्रमांक- कोल्हापूर विभाग

You might also like