शुक्रवारी (8 सप्टेंबर) प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघात लढत झाली. हा सामना चाहत्यांसाठी चांगलाच रोमांचक ठरला. सामन्याच्या शेवटच्या चेंडूपर्यंत दोन्ही संघांत संघर्ष पाहायला मिळाला. आरसीबीला त्यांच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती. अशात आरसीबीच्या श्रीकर भरतने शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीवर मिळवलेल्या विजयानंतर आरसीबीचे सर्व खेळाडू आनंद साजरा करताना पाहिले गेले.
आरसीबीला डावातील शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. दिल्लीचा आवेश खान गोलंदाजीसाठी आला होता. पहिल्याच चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने चौकाराने त्याचे स्वागत केले. दुसऱ्या चेंडूवर मॅक्सवेलने दोन धावा घेतल्या आणि त्याचे अर्धशतक पूर्ण केले. षटकातील तिसरा चेंडू मॅक्सवेलच्या पायावर लागला आणि यष्टीरक्षक आणि दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद करार दिले. या चेंडूवर मॅक्सवेलला लेग बायची एक धाव मिळाली. आता आरसीबीला तीन चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती.
षटकातील चौथा चेंडू श्रीकर भरतने डॉट घातला. शेवटच्या दोन चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. पाचवा चेंडू आवेशने यॉर्कर टाकला आणि भरतने त्यावर दोन धावा घेतल्या. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता असताना आवेश खानने वाइड चेंडू टाकला आणि एक धाव मिळाली. त्यानंतर विजयासाठी पाच धावांची आवश्यकता होती. शेवटचा चेंडू आवेश खानने फुल टॉस टाकला आणि भरतने तो मैदानाबाहेर टोलवला.
सामन्यात आरसीबीने विजय मिळवल्यानंतर संघाचे सर्व सदस्य आनंदात दिसले. आयपीएलने त्यांच्या ट्वीटर खात्यावरून आरसीबीच्या एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत खेळाडू आनंद साजरा करताना दिसत आहेत.
Scenes from the #RCB camp as @KonaBharat finishes it off in style.#VIVOIPL #RCBvDC pic.twitter.com/ApyHdTuJ9U
— IndianPremierLeague (@IPL) October 8, 2021
आरसीबीने सामन्यात विजय मिळवला असला तरी यामुळे गुणतालिकेत काही फरक पडलेला नाही. दिल्ली पहिल्या स्थानावर असून त्यांना अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत. क्वाॅलिफायर १ मध्ये विजयी होणार संघ अंतिम सामन्यात स्थान पक्के करणार असून या सामन्यात पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघासोबत क्वाॅलिफायर २ मध्ये भिडणार आहे. त्यानंतर क्वाॅलिफायर २ मधील विजयी संघाला अंतिम सामन्यात संधी मिळेल.
असे असतील प्लेऑफचे सामने
पहिला क्वॉलिफायर, १० ऑक्टोबर (दुबई) – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
एलिमिनेटर, ११ ऑक्टोबर (शारजाह) – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
क्वॉलिफायर २, १३ ऑक्टोबर (शारजाह) – एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ आणि क्वॉलिफायर १ मधील पराभूत संघ
अंतिम सामना, १५ ऑक्टोबर (दुबई) – क्वॉलिफायर १ चा विजेता आणि क्वॉलिफायर २ चा विजेता संघ
महत्त्वाच्या बातम्या-
पलटणचा विषयचं वेगळा! आयपीएल २०२१मध्ये दिल्ली ‘टेबल टॉपर’, पण गुणतालिकेवर मुंबईचाच राहिलाय राज
हैदराबाद पहिल्यांदाच गुणतालिकेत तळाशी, पण खालून पहिला येण्यात ‘या’ संघांची जणू पीएचडीच झालीय!
आयपीएल २०२१चे टॉप-४ संघ मिळाले, मग यापूर्वी प्रत्येक हंगामात प्लेऑफ गाठणारे संघ माहितीय का? वाचा