भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) मुंबई येथे ९२ व्या वर्षी निधन झाले. जगभरात आपल्या सुमधुर आवाजाने भारतीय संगीताची आगळीवेगळी ओळख त्यांनी करून दिली. त्यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटविश्वातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. दीदी या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या लता मंगेशकर यांचा क्रिकेटशी देखील तितकाच नजीकचा संबंध होता. त्यांचे व आणि क्रिकेटपटूंचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या याच क्रिकेटप्रेमाचे काही किस्से आपण जाणून घेऊया.
विश्वविजेत्या संघाला केली मोलाची मदत
कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने जिंकलेला १९८३ क्रिकेट विश्वचषक हा भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती आणणार होता. विश्वचषक जिंकल्यानंतर त्या संघाचे सर्वत्र कौतुक होत होते. कौतुक होत असले तरी खेळाडूंना आर्थिक मदत मिळाली नव्हती. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे लक्ष्मी पाणी भरत असली तरी, त्या वेळी परिस्थिती वेगळी होती. क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना रोख रक्कम देण्याची इच्छा होती. मात्र, पैशाअभावी ते हतबल होते.
या सर्वातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी लतादीदींना आवाहन केले. देशाची मान उंचावणाऱ्या खेळाडूंना मदत करण्यासाठी लतादीदी एका पायावर तयार झाल्या. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये त्यांच्या गाण्यांचा एक कॉन्सर्ट घेण्यात आला. हा कॉन्सर्ट तुफान यशस्वी झाला व यातून २० लाख रुपये जमा झाले. त्यानंतर सर्व खेळाडूंना प्रत्येकी १ लाख रुपयांचे बक्षीस दिले गेले. आजही त्या संघातील अनेक खेळाडू लतादीदींच्या या मदतीची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्या मदतीची परतफेड म्हणून बीसीसीआय तेव्हापासून आजतागायत लतादीदी यांच्यासाठी प्रत्येक स्टेडियममध्ये दोन राखीव सीट ठेवत असते.
“मी फक्त लता मंगेशकर यांना ओळखतो”
लतादीदींच्या आवाजाचे गारुड त्यावेळी सर्वसामान्य भारतीयांसह सेलिब्रिटी लोकांमध्येही होते. सन १९८२ मध्ये भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावेळी लाहोर येथे एका पार्टीचे आयोजन करण्यात आलेले. दोन्ही क्रिकेट संघासह पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटी या पार्टीला हजर होते. त्या वेळी भारतीय संघाचे व्यवस्थापक असलेले बडोदा महाराज फतेहसिंग गायकवाड तमाम सेलिब्रिटींना भारतीय संघाची ओळख करून देत होते. त्यावेळी पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या नूरजहाँ यांना गायकवाड यांनी सुनील गावसकर यांची ओळख भारतीय कर्णधार अशी करून दिली. त्यावर नूरजहाँ यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने उत्तर देत म्हटले,
“मी केवळ झहीर अब्बास व इम्रान खान यांनाच ओळखते.”
याच संभाषणात फतेहसिंग गायकवाड यांनी गावसकर यांना नूरजहाँ यांची ओळख करून देताना म्हटले, “या आहेत मल्लिका ए तरन्नूम नूरजहाँ, तुम्ही यांना ओळखत असाल?” यावर गावसकर यांनी अगदी क्षणाचाही विलंब न लावता म्हटले, ,”नाही मी केवळ लता मंगेशकर यांनाच ओळखतो.” लतादीदी व गावसकर दोघेही मुंबईचे निवासी असल्याने एकमेकांना परिचित होते. तसेच ते दोघे एकमेकांचा त्यांच्या क्षेत्रात असलेल्या योगदानासाठी अत्यंत आदर करत. लतादीदींनी आपल्याला सुनील गावसकर यांची फलंदाजी पाहायला खूप आवडते असे एका कार्यक्रमात म्हटले होते.
सचिनची आई आणि धोनीच्या फॅन
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे लतादीदींची अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. ते दोघे एकमेकांना आपल्या वाढदिवशी शुभेच्छा देत. सचिन लतादीदी यांना आई या नावाने हाक मारत. तसेच, सचिनसारखा कर्तुत्ववान मुलगा मला आहे असे लतादीदी आवर्जून सांगत. याचबरोबर, लतादीदी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या प्रचंड मोठ्या चाहत्या होत्या. २०१९ मध्ये धोनी निवृत्ती घेणार आहे, अशा अफवा उठल्यानंतर लतादीदींनी स्वतः ट्वीट करत धोनीला तू निवृत्ती घेऊ नकोस अशी विनंती केली होती.
भारतीय क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील सीसीआय (ब्रेबॉर्न स्टेडियम) येथे त्या ६० च्या दशक आता आवर्जून कसोटी सामने पाहायला येत. निस्सिम क्रिकेट चाहत्या असलेल्या लतादीदींच्या क्रिकेटप्रेमाला कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही.
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाने ‘अशाप्रकारे’ लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली
विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं (mahasports.in)