वनडे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक! हा विचार करूनच क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साह संचारू शकतो. परंतु, अनिश्चितेसाठी प्रसिद्ध असलेल्या या खेळामध्ये आता हे देखील घडले आहे. या स्पर्धेला आयसीसी अथवा देशांतर्गत क्रिकेट मंडळाची मान्यता नसली तरी, ५० षटकांच्या सामन्यात तिहेरी शतक ठोकणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, कर्नाटकचा २१ वर्षीय फलंदाज लवनीथ सिसोदियाने हा कारनामा करून दाखविला आहे.
लवनीथने केली ३१२ धावांची खेळी
कर्नाटकचा डावखुरा फलंदाज लवनीथने कॉर्पोरेट वनडे स्पर्धेच्या सामन्यात तिहेरी शतकाचा करिष्मा करून दाखवला. आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा (२६४) भारताच्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध केल्या होत्या. रोहितने २०१४ मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर अशी कामगिरी केली होती. अर्थात, याची तुलना लवनीथ सिसोदियाच्या तिहेरी शतकाशी करता येणार नाही. कारण, स्थानिक स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दबाव वेगळा असतो. तसेच खेळाडूंच्या गुणवत्तेत फरक असतो. परंतु, त्या संघांसाठी त्या खेळीचे मूल्य तितकेच असते.
कॉर्पोरेट वनडे सामन्यात खेळताना लवनीथ सिसोदियाने केवळ १२९ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटने ३१२ धावा फटकावल्या. या वादळी खेळीमध्ये लवनीथने २६ चौकार व २६ षटकार लगावले. या खेळी दरम्यान त्याच्या समोर प्रत्येक गोलंदाज पाणी मागताना दिसला.
कोण आहे लवनीथ?
लवनीथ सिसोदिया हा कर्नाटक राज्याकडून क्रिकेट खेळतो. सन २०१९ व २०२० च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेवेळी त्याचा कर्नाटक संघात समावेश होता. मात्र, मिळालेल्या संधीमध्ये तो संघ व्यवस्थापनाला आकर्षित करू शकला नाही. यष्टिरक्षक म्हणून खेळणाऱ्या लवनीथने यापूर्वी देखील अशा मोठ्या खेळ्या खेळल्या आहेत. २०१८-२०१९च्या कूचबिहार ट्रॉफीवेळी त्याने पंजाब विरुद्ध २३४ धावांची खेळी खेळली होती.
महत्वाच्या बातम्या:
सिराज-कुलदीपमध्ये झाली हमरातुमरी?, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारताच्या संघव्यवस्थापनाची पहिल्या कसोटीसाठी हास्यास्पद संघनिवड, या दिग्गजाची टीका
दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन