श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या महत्वाकांक्षी लंका प्रीमियर लीगच्या मार्गातील साडेसाती कमी व्हायचे नाव घेत नाही. मागील दोन दिवसात ख्रिस गेल आणि लसिथ मलिंगा यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर आता आयोजकांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. स्पर्धेसाठी दाखल झालेल्या दोन विदेशी खेळाडूंचा कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोहेल तन्वीरचा कोविड अहवाल पॉझिटिव
बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याच्या मालकीच्या कँडी टस्कर्स संघाचा पाकिस्तानी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर हा स्पर्धा सुरू होण्यासाठी सात दिवस शिल्लक असताना कोविड संक्रमित झाला आहे. तन्वीर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वहाब रियाझ याचा बदली खेळाडू म्हणून कँडी संघात दाखल झाला होता.
याच संघात भारताचे माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि मुनाफ पटेल यांचा समावेश आहे. तन्वीरचा कोविड अहवाल पॉझिटिव आल्यानंतर, संघाचे प्रशिक्षक हसन तिलकरत्ने यांनी म्हटले आहे की, “ही आमच्यासाठी वाईट बातमी आहे. आम्ही संघ मालकांशी याबाबत बोलणार आहोत. त्यानंतर, तन्वीरच्या जागी नवीन बदली खेळाडू आणण्याचा प्रयत्न करू.”
कोलंबो किंग्जचा रविंदरपाल सिंगदेखील कोविड संक्रमित
तन्वीरसोबतच, कोलंबो किंग्ज संघात निवडला गेलेला कॅनडाचा सलामीवीर रविंदरपाल सिंह याचादेखील कोविड-१९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. तन्वीर आणि सिंग या दोघांना आता दोन आठवडे सक्तीच्या विलगीकरणात राहावे लागणार आहे.
लंका प्रीमियर लीगची घोषणा झाल्यापासून या स्पर्धेच्या मार्गात अनेक अडथळे आले आहेत. दोन वेळा स्पर्धा स्थगित केल्यानंतर २७ नोव्हेंबरपासून ही स्पर्धा होणार आहे. सोबतच ख्रिस गेल, लसिथ मलिंगा, कार्लोस ब्राथवेट, फाफ डू प्लेसिस, डेविड मिलर या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता स्पर्धा यशस्वी करून दाखवण्याचे मोठे आव्हान आयोजकांसमोर असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
लंका प्रीमियर लीगला मोठा धक्का; वेस्ट इंडिजच्या ‘बड्या’ खेळाडूची स्पर्धेतून माघार
२०११ विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेटर खेळणार लंका प्रीमियर लीगमध्ये
धक्क्यावर धक्के! आंद्रे रसेलसह पाच परदेशी खेळाडूंची ‘या’ मोठ्या टी२० लीगमधून माघार