जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) (IPL 2022) पुढील हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. स्पर्धेतील मूळ आठ संघांनी आपापल्या खेळाडूंना कायम केल्यानंतर, लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांना आपले प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची मुदत ३१ डिसेंबर देण्यात आली आहे. हे दोन्ही संघ दोन भारतीय व एक विदेशी खेळाडू निवडू शकतात. आता या दोन्ही संघांच्या प्रत्येकी तीन खेळाडूंची नावे समोर येऊ लागली आहेत.
हे तिघे असू शकतात लखनऊ संघाचा भाग
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा संघ म्हणून लखनऊ फ्रॅंचाईजी ओळखली जाते. या संघाने नुकतेच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir Lucknow Mentor) याला मार्गदर्शक तर ऍण्डी फ्लॉवर यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, लखनऊ फ्रॅंचाईजी भारताचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) याला संघात घेण्यास इच्छुक असून, त्याला त्यांनी तब्बल २० कोटी रुपये देण्याची ऑफर दिली आहे. असे झाल्यास राहुल आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरेल. याचबरोबर लखनऊ संघ अफगाणिस्तानचा मातब्बर फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याला देखील आपल्या ताफ्यात सामील करू इच्छिते. तसेच, तिसरा खेळाडू म्हणून भारताचा प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल व युवा धडाकेबाज फलंदाज इशान किशन यांच्यामध्ये चुरस असेल.
अहमदाबाद लावू शकते यांच्यावर बोली
लखनऊप्रमाणे अहमदाबाद फ्रॅंचाईजी आणखी एका भारतीय युवा खेळाडूवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतून कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरला (Sheryas Iyer) अहमदाबाद कर्णधार म्हणून नियुक्त करण्यास इच्छुक आहे. श्रेयस याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले होते. त्याच वेळी त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (David Warner) यालादेखील करारबद्ध करण्यास फ्रॅंचाईजी उत्सुक आहे. तर तिसऱ्या खेळाडूच्या रुपात ते भारताचा प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला संघात सामील करू शकतात. विशेष म्हणजे हार्दिक हा गुजरात राज्याचा रहिवासी आहे.
नव्याने सामील झाले दोन्ही संघ
ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या दोन नव्या संघांच्या प्रवेश प्रक्रियेनंतर अहमदाबाद व लखनऊ हे संघ आगामी काळात आयपीएल खेळण्यासाठी पात्र ठरले. आरपीएसजी ग्रूपने ७०९० कोटी रुपये खर्च करत लखनऊ संघ खरेदी केला तर, सीव्हीसी कॅपिटलने ५१६६ कोटी रुपयांची बोली लावत अहमदाबाद संघ खरेदी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआय-विराट वाद रंगला असतानाच वरिष्ठ अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा; दिले ‘हे’ कारण
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आगळीक! खेळाडूंना केस कापण्यास दिली नाही परवानगी; वाचा सविस्तर