पुणे। महाराष्ट्र बुद्धिबळ संघटने(एमसीए)च्या वतीने आणि अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघा(एआयसीएफ)यांच्या मान्यतेने येत्या 31 मे ते 8 जून दरम्यान दोन आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिली महाराष्ट्र इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर स्पर्धा 2000 पेक्षा अधिक एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंसाठी असून ही स्पर्धा 31 मे ते 8 जून 2022 दरम्यान रंगणार हे. तर दुसरी पुणे ओपन बुद्धिबळ स्पर्धा 1 ते 4 जून या कालावधीत पार पडणार आहे.
या दोन्ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडासंकुल, बालेवाडी म्हाळुंगे येथील बॉक्सिंग कॉम्प्लेक्समध्ये होणार असून 13 देश आणि भारतातील 20 राज्यांमधील अव्वल बुद्धिबळपटूंनी स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते होणार आहे.
या वेळी जागतिक बुद्धिबळ महासंघाचे उपाध्य ग्रॅन्डमास्टर निगेल शॉर्ट, तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष ड़ॉ. सुनील फुके, कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रॅन्डमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे व गिरीश चितळे, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव भारतसिंग चौहान, तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व निमंत्रक अशोक जैन उपस्थित राहणार आहेत.
पहिली महाराष्ट्र इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर स्पर्धा सध्याच्या मानांकन यादीत 2000 पेक्षा अधिक एलो गुणांकन असलेल्या खेळाडूंसाठी असून विजेत्यांना वीस लाख रुुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. फिडे नियमांच्या आधारे व स्विस लीग पद्धतीने होणारी ही स्पर्धा एकूण 11 फेर्यांची राहील.
ग्रॅन्डमास्टर फारूख अमोनातोव्ह (एलो मानांकन 2622) याला या स्पर्धेतील अग्रमानांकन देण्यात आले असून, ललित बाबू एम आर (एलो मानांकन 2563) हा सर्वोच्च मानांकित भारतीय खेळाडू आहे. तसेच महिला इंटरनॅशनल मास्टर भक्ती कुलकर्णी, महिला इंटरनॅशनल मास्टर सौम्या स्वामिनाथन, महिला ग्रॅन्डमास्टर मेरी अॅन गोम्स, महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख, महिला ग्रॅन्डमास्टर प्रियांका नुटाक्की या अव्वल दर्जाच्या महिला खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी या स्पर्धेतून लाभणार आहे.
भारताबरोबरच ताजिकिस्तान, बेलारूस, जॉर्जिया, अझरबैजान, अमेरिका, श्रीलंका, बांगला देश या देशांमधील खेळाडूंनी स्पर्धेतील आपला सहभाग निश्चित केला असून एकूण 20 ग्रॅन्डमास्टर, 27 इंटरनॅशनल मास्टर, पाच महिला ग्रॅन्डमास्टर आणि सात महिला इंटरनॅशनल मास्टर खेळाडूंचा समावेश आहे.
या स्पर्धेपूर्वीच्या गेल्या 36 महिन्यांच्या काळात 2000 एलो गुणांकनाचा टप्पा पार न करता आलेले खेळाडू पुणे ओपन बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरणार असून विजेत्यांसाठी एकूण 10 लाख रुपयांची पारितोषिक रक्कम पणाला लागणार आहे. फिडे नियमांच्या आधारे व स्विस लीग पद्धतीने होणारी ही स्पर्धा एकूण 10 फेर्यांची राहील.
या स्पर्धेच्या निमित्ताने ग्रॅन्डमास्टर निगेल शॉर्ट यांच्या सामूहिक बुद्धिबळ लढतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लढतीत ग्रॅन्डमास्टर निगेल शॉर्ट विविध वयोगटातील व विविध मानांकन असेलल्या 25 खेळाडूंशी एकाच वेळी खेळणार आहे. ही लढत या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या रोहित-विराटला आरामाची गरज’, श्रीलंकेच्या दिग्गजाने मांडले मत
वनप्लेस करंडक चॅम्पियनशीप सिरीज: पुण्याच्या सृष्टी सूर्यवंशीला दुहेरी मुकुट