fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र ५७ पदकांसह आघाडीवर 

पुणे: खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. गुरुवार अखेर १५ सुवर्ण, १९ रौप्य आणि २३ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राच्या संघाने ५७ पदकांसह आघाडी घेतली. दिल्लीचे खेळाडू १३ सुवर्ण पदकांसह ३६ पदकांनी द्वितीय आणि हरयाणा १२ सुवर्ण पदकांसह ४० पदकांनी तृतीय क्रमांकावर होते.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिम्नॅस्टिक आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये घवघवीत यश मिळवित पदकांची कमाई केली आहे.

अ‍ॅथलेटिक्स -महाराष्ट्राच्या सौरभ रावत याने पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकून अ‍ॅॅथलेटिक्समध्ये शानदार कामगिरी केली. धैर्यशील गायकवाड याने १७ वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले तसेच अभिजीत नायर याने २१ वषार्खालील गटात गोळाफेकीत ब्राँझपदक पटकाविले. सतरा वषार्खालील मुलांच्या उंच उडीत महाराष्ट्राच्या आधार दत्ता याने ब्राँझपदकाची कमाई केली. तर, महाराष्ट्राच्या ताई बामने हिने पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्रॉंझपदक पटकाविले.

मुलांच्या १७ वषार्खालील गटात सौरभ याने धावण्याचे उत्तम कौशल्य दाखवित पंधराशे मीटर्सचे अंतर चार मिनिटे २२.१५ सेकंदात पार केले. उंच उडीत धैर्यशील गायकवाड याने १७ वषार्खालील गटात उंच उडीत रौप्यपदक पटकाविले. धैर्यशील व पंजाबचा रॉबिनदीप सिंग यांनी प्रत्येकी १.९८ मीटर्सपर्यंत उडी मारली. तथापि रॉबिन याने कमी प्रयत्नात हे अंतर पार केल्यामुळे त्याला सुवर्णपदक मिळाले. धैर्यशील याला दुसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याचा सहकारी दत्ता याने १.९२ मीटर्सपर्यंत उडी मारली व तिसरे स्थान घेतले.

महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा देवरे हिने अ‍ॅथलेटिक्समधील पहिल्या दिवशी आपल्या राज्याला आणखी एक सोनेरी यश मिळवून दिले. तिने २१ वषार्खालील मुलींच्या गटात पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिने हे अंतर ४ मिनिटे ३७.१८ सेकंदात पूर्ण केले. ती नाशिक येथे विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने या शर्यतीत दिल्लीच्या अंकिता चहल (४ मिनिटे ३७.३३ सेकंद) व राधा चौधरी (४ मिनिटे ४१.०७ सेकंद) यांच्यावर मात केली.

जिम्नॅस्टिक्स – जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या गुरुवारी कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी पाच सुवर्ण, चार रौप्य व पाच ब्राँझपदकांची लयलूट करीत उल्लेखनीय यश मिळविले. मुलींच्या १७ वषार्खालील गटात श्रेया भंगाळे (चेंडू रचना), क्रिशा छेडा (हूप), सिद्धी हत्तेकर (असमांतर बार) यांनी सोनेरी कामगिरी केली. मुलांमध्ये मनेश गाढवे याने पॉमेल हॉर्स प्रकारात सुवर्णपदक जिंकले. तो मुंबई येथील प्रगती महाविद्याालयात शिकत असून गतवर्षी त्याने खेलो इंडियात याच प्रकारात विजेतेपद मिळविले होते. ठाण्याचा श्रेयस मंडलिक याने रिंग्ज प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्याने आणखी एक रौप्य व एक ब्राँझपदकाची भर घातली.

जलतरण – महाराष्ट्राच्या करीना शांक्ता, शेरॉन शाजू व मिहिर आंम्ब्रे यांनी सोनेरी वेध घेत जलतरणात चांगली कामगिरी केली. त्याखेरीज ज्योती पाटील व ऋतुजा तळेगावकर यांनी रौप्यपदक मिळविले. साध्वी धुरी हिने एक रौप्य व एक ब्राँझपदक पटकाविले.

मुलींच्या १७ वषार्खालील गटात करीना हिने १०० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट १६.८२ सेकंदात पूर्ण केली. तिने अलियाह सिंग (उत्तरप्रदेश) व रचना राव (कर्नाटक) यांच्यावर सहज मात केली. मुलींच्या २१ वषार्खालील विभागात शेरॉन हिने १०० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट १६.८६ सेकंदात जिंकताना आपलीच सहकारी ज्योती पाटील हिच्यावर मात केली. २०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत साध्वी धुरी हिने ब्राँझपदक मिळविताना हे अंतर दोन मिनिटे १९.३४ सेकंदात पार केले. तिने ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिला हे अंतर पार करण्यास ३०.८९ सेकंद वेळ लागला. ऋतुजा तळेगावकर हिने ८०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. मुलांच्या २१ वषार्खालील विभागात मिहिर आंम्ब्रे याने ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यत २५.७१ सेकंदात जिंकली. त्याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

कुस्तीमध्ये महाराष्ट्राला तीन रौप्य – कुस्तीमध्ये महाराष्ट्राच्या गोकुळ यादव व रोहित अहिरे यांनी मुलांच्या विभागात तर भाग्यश्री फंड हिने मुलींमध्ये रुपेरी कामगिरी केली. मुलींच्या १७ वषार्खालील गटात भाग्यश्री फंड हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला अंतिम फेरीत हरयाणाच्या नोजू हिने सहज हरविले. संजना बागडी व सुप्रियाकुमारी या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ६५ किलो गटात ब्राँझपदक पटकाविले. ६१ किलो गटात महाराष्ट्राच्या सृष्टी भोसले हिने ब्राँझपदक मिळविले. ५३ किलो गटात दिशा करांडे हिने ब्राँझपदकाची कमाई केली. ४९ किलो गटात स्मिता पाटील हिने ब्राँझपदक मिळविले.

मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राच्या गोकुळ यादव याला रौप्यपदक मिळाले. ७७ किलो गटातील अव्वल साखळी लढतीत त्याने हरयाणाच्या अंकितकुमार याला हरविले मात्र त्याला अन्य लढतीत अमितकुमार या हरयाणाच्या मल्लाने त्याला पराभूत केले. या गटातच तीनच मल्ल सहभागी झाले होते. ७२ किलो गटात महाराष्ट्राच्या रोहित अहिरे याला रौप्यपदक मिळाले. त्याला राजस्थानच्या छगनकुमार याने एकतर्फी लढतीत पराभूत केले. ९७ किलो विभागात महाराष्ट्राच्या दिग्विजय भोंडवे याने ब्राँझपदकाची कमाई केली.

ज्युदो स्पर्धेत प्रथम गुरवला ब्राँझपदक :- महाराष्ट्राच्या प्रथम गुरव याने ब्राँझपदक मिळविले. त्याने १७ वषार्खालील मुलांच्या ५५ किलो गटात हे पदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्लीच्या ज्युदोकांनी सहापैकी तीन गटांमध्ये सुवर्णपदके जिंकून वर्चस्व गाजविले.

You might also like