fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- सागर मारकडचा सुवर्ण चौकार

वेताळची पदार्पणातच सोनेरी झेप

-संजय दुधाने (Twitter- @sanjaydudhane23 )
जालना :- पुण्याच्या सागर मारकडने सलग चौथ्या वर्षी सलग चौथे सुवर्णपदक पटकाविण्याची किमया केली आहे. तर पुण्याच्या अक्षय चोरघेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले असून, सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे व वेताळ शेडके आणि कोल्हापूरच्या आशिष तावरेने आपापल्या वजनीगटात सुवर्णपदक पटकाविले आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती अधिवेशन हे जालना येथील आझाद मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, अहमदनगर, औरंगाबाद, अमरावती जिल्ह्यांच्या मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करत आपापल्या प्रतिस्पर्धकावर मात करत केली.

महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी किताब व राज्य अजिंक्यपद कुस्ती अधिवेशन हे कुस्तीगीरांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्टयेची मानली जाते. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुणे, कोल्हापुर, सोलापूर,अहमदनगर, लातूर, औरंगाबाद, अहमदनगर येथील मल्लांनी नेत्रदीपक लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. दुसऱ्या दिवशी जालना वासीयांनी मोठी गर्दी केल्याने मैदान तुडूंब भरले होते.

दुसऱ्या दिवशी गादी व माती विभागातील ५७ आणि ७९ किलो वजनी गटातील सेमीफायनल व फायनलच्या लढतीसह ६१, ७० व ८६ किलोच्या प्रेक्षणीय लढतींनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

५७ किलो माती विभागात पुणे जिल्ह्याचा गतवर्षीच्या सुवर्णपदक विजेत्या सागर मारकडने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत दुसऱ्या दिवशीहि प्रेक्षनिय लढती केल्या. उपांत्यपूर्व फेरीत सागरने पुणे शहराच्या किरण शिंदेचा १०-० ने पराभव करून उपांत्यफेरीत (सेमीफायनल) प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये सागरने कोल्हापूरच्या ओंकार लाडला चारीमुंडया चितपट करून अंतिमफेरी फेरी गाठली. तर कोल्हापूर शहराच्या संतोष हिरगुडेने उपांत्यपूर्व फेरीत परभणीच्या राजेश पोलेला चितपट चितपट करून सेमीफायनल गाठली.

संतोषने सेमीफायनलमध्ये संतोष आणि लातूरच्या शिवराज हाके यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. या लढतीत अखेरपर्यंत कोण बाजी मारणार हे सांगता येत नव्हते. निर्धारित वेळेत दोघांचेही सारखे ९-९ गुण झाले होते. मात्र गुणतालिकेत संतोषने उच्चकलात्मक डावांच्या अधिक पकडी केल्याने तो विजेता ठरला आणि अंतिमफेरीत पोहचला. तिसऱ्या क्रमांकासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा ओंकार लाड व लातूरचा शिवराज हाके यांच्यात झालेली लढतहि अत्यंत चुरशीची झाली. या लढतीत ओंकारने शिवराजवर १०-९ असा निसटसा विजयी मिळवून कांस्यपदकाची कमाई केली. अंतिम लढत सागर मारकड व संतोष हिरगुडे यांच्यात झाली. यामध्ये सागरने संतोषचा १०-० अशा एकतर्फी गुणफरकाने पराभव करून राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सलग चौथ्यांदा सुवर्ण पदक पटकाविले तर संतोषला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

५७ किलो गादी विभागात पुणे जिल्ह्याच्या स्वप्नील शेलारचे आव्हान संपुष्टात आले. त्याला मुंबईच्या सचिन पाटीलने ६-५ अशा निसटत्या गुणफरकाने पराभूत केले. सेमीफायनल सोलापूरच्या सुरज अस्वले व सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे यांच्यात झाली. यामध्ये ज्योतिबाने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत सुरजचा १५-२ पराभव करून अंतिमफेरीत धडक मारली.

तर दुसऱ्या सेमीफायनलच्या लढतीत साताऱ्याच्या प्रदीप सुळनेही त्याच्या लौकिकाप्रमाणे खेळ करत मुंबईच्या सचिन पाटीलचा १०-० असा एकतर्फी पराभव करून अंतिमफेरीत प्रवेश केला.तिसऱ्या (कांस्यपदक) क्रमांकासाठी झालेल्या लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या भरत पाटीलने कोल्हापूर शहराच्या सुरज अस्वलेचा १४-११ असा पराभव करून कांस्यपदक पटकाविले , तर मुंबईच्या सचिन पाटीलने पुणे शहराच्या अजय भोईरला चितपट करून कांस्यपदकाची कमाई केली.

अंतिम लढतीत सोलापूरच्या ज्योतिबा अटकाळेने त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करत साताऱ्याच्या प्रदीप सुळचा ४-१ असा पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले.

७९ किलो माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूरच्या वेताळ शेडकेने उस्मानाबादच्या हणमंत पुरीला चारीमुंडया चितपट करून सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर औरंगाबादच्या अजहर शेखने साताऱ्याच्या किरण बरकडने अटीतटीच्या लढतीत पराभव करून कांस्य पदकाची कमाई केली.

७९ किलो गादी विभागाच्या अंतिम लढतीत कोल्हापूर जिल्ह्याच्या आशिष वावरेने पुणे जिल्ह्याच्या अक्षय चोरघेचा १०-२ असा पराभव करुन सुवर्ण पदक जिंकले, तर अक्षयला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच अमरावतीच्या अब्दुल शोएबने हिंगोलीच्या रामदास जाधवचा ९-३ अशा गुणफरकाने पराभव करून कांस्यपदक जिंकले, तर अहमदनगरच्या केवल भिंगारेने जालनच्या बाबासाहेब चव्हाणला चीतपट करून कांस्य पदकाची कमाई केली.

महत्त्वाच्या बातम्या:

महाराष्ट्र केसरीच्या मैदानातून- मोहोळ कुटुंबियाकडून सलग 35 व्या वर्षी गदेचे बक्षिस

महाराष्ट्र केसरीचा थरार जालनात सुरू, पहा संपुर्ण वेळापत्रक...

महाराष्ट्र केसरी यशोगाथा भाग १- सुरू झाले नवे कुस्तीपर्व

महाराष्ट्र केसरीच्या थेट मैदानातून- अभिजीत कटके, माऊली, गणेश, शिवराज प्रबळ दावेदार

संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी

You might also like