fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडू दिया चितळेची सुवर्ण व कांस्यपदकाची कमाई

गुवाहाटी। महाराष्ट्राच्या युवा टेबल टेनिस खेळाडू दिया चितळेने खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत मुलींच्या 17 वर्षाखालील गटात जेतेपद मिळवले. ज्युनियर आणि युथ राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या दियाने स्वस्तिका घोषसोबत खेळताना मुलींच्या दुहेरीत देखील कांस्यपदक मिळवत दुसरे पदक आपल्या नावे केले.

या गटातील अंतिम सामन्यात दियाने आपली संघसहकारी स्वस्तिका घोषवर 7-11, 11-7, 11-8, 11-9, 5-11, 3-11, 13-11 असा चुरशीच्या लढतीत विजय मिळवला.दोघींमध्ये जेतेपद मिळवण्यासाठी चांगली चुरस पहायला मिळाली. निर्णायक गेममध्ये स्वस्तिका 7-2 अशी आघाडीवर होती. पण, दियाने जोरदार खेळ करत विजय मिळवला व सामना जिंकला.

गेल्या महिन्यात दियाने युथ व ज्युनियर गटाचे राष्ट्रीय जेतेपद मिळवले होते. दुहेरी जेतेपद मिळवणारी महाराष्ट्राच्या इतिहासातील ती पहिलीच खेळाडू ठरली. गेल्या वेळी याच गटात तिला रौप्यपदक मिळाले होते त्यामुळे हे पदक तिच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्हाला एकमेकांची खेळायची पद्धत माहीत आहे. त्यामुळे सामना चुरशीचा होईल याची कल्पना होती. चौथ्या गेमपर्यंत सर्वकाही सुरळीत होते मी 3-1 अशी आघाडीवर होते. पण, स्वस्तिकाने खेळ उंचावत लढत निर्णायक गेमपर्यंत नेली. असे दिया आपल्या विजयानंतर म्हणाली.

मी ज्या पद्धतीने पुनरागमन करत तीन मॅच पॉईंट वाचवले त्यामुळे मी आनंदी आहे. हा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे कारण, गेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मला अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. असे ज्युनियरच्या जागतिक क्रमवारीत 35 व्या स्थानी असलेल्या मुंबईच्या दियाने सांगितले.

मुलींच्या दुहेरीत दिया स्वस्तिका सोबत उतरली व या जोडीने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्रा ओव्हरऑल चॅम्पियन्स ठरला. त्यांनी दोन सुवर्णपदक, चार रौप्यपदक आणि एक कांस्यपदक मिळवले.महाराष्ट्र संघाने 17 वर्षाखालील व 21 वर्षाखालील दोन्ही गटात देखील बाजी मारली.

You might also like