fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

महाराष्ट्र राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा: पुणे, मुंबई उपनगरचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे,मुंबई उपनगर यांनी “६६व्या वरिष्ठ गट पुरुष महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” महिला गटात अंतिम फेरीत धडक दिली आहे. तर पुरुष गटात सांगली, रायगड अंतिम फेरीत दाखल झाले आहेत.
गतवर्षी उपनगरने पुण्याची १०वर्षांची विजयी परंपरा मोडीत काढत विजेतेपद मिळविले होते. यंदा हेच दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
सिन्नर-नाशिक येथील आडवा फाटा मैदानावर सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात पुण्याने रत्नागिरीला २७-१८ असे पराभूत केले. मध्यांतराला १८-०९अशी आघाडी घेणाऱ्या पुण्याने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला.
पुण्याच्या दीपिका जोसेफने एकाच चढाईत ४गुण घेत या विजयात मोलाची भूमिका बजावली.तिने एक बोनस व एक पकड देखील केली. स्नेहल शिंदेने १३चढायात १बोनस व ५गुण मिळवीत,तर अंकिता जगतापने ३ आणि कोमल जोरीनें २पकड घेत मोलाची साथ दिली.
रत्नागिरिच्या तसमीन बुरोंडकरने ३पकडी करीत प्रतिकार केला. श्रद्धा पवारची मात्रा आज चालली नाही. दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरने पालघरला ४७-१४असे नमवित अंतिम फेरी गाठली. हा सामना तसा एकतर्फीच झाला. मध्यांतराला २२-०६अशी मोठी आघाडी उपनगरकडे होती.
या विजयात उपनगरच्या सायली नागवेकरने ७चढायात १बोनससह ५गुणांची कमाई केली.एक पकड देखील तिने केली.कोमल देवकरने ११चढायात २बोनससह ५गुण घेतले. राणी उपहारने ५पकडी यशस्वी केल्या. पालघरच्या ऐश्वर्या काळे,लता भगतचा आज सूर हरपला. समृद्धी तामडीने ५पकडी यशस्वी करीत थोडाफार प्रतिकार केला.
पुरुषांत सांगलीने मुंबई शहराला २८-१९असे पराभूत केले. मध्यांतराला १५-०९अशी सांगलीकडे आघाडी होती. सांगलीकडून राहुल वडारने १०चढाया करीत १बोनस व ५ गुण घेतले. योगेश भिसेने १४चढायात ५गुण मिळविले. रोहित बंने, कृष्णा माळी यांनी ३ व २पकडी करीत त्यांना छान साथ दिली.
मुंबई कडून सुशांत साईलने १५चढायात २बोनस व ३गुण घेतले. विजय दिवेकर व संकेत सावंत यांनी २-२पकडी केल्या. पण संघाला पराभवापासून ते वाचवू शकले नाही.
रायगडाने मध्यांतरातील ०८-१४अशा ६गुणांच्या पिछाडीवरून रत्नागिरीला २५-२३असे नमवित अंतिम फेरी गाठली. सुलतान डांगे, मिथेश पाटील, आमीर धुमाळ या विजयात चमकले. रत्नागिरी कडून रोहन उके, आदित्य शिंदे यांचा चतुरस्त्र खेळ संघाचा पराभव टाळण्यास मात्र कमी पडला.

 

महत्त्वाच्या बातम्या:

Video: एमएस धोनीने विराटला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा नक्की पहा

जे कोणत्याही कर्णधाराला जमले नाही ते रोहित शर्माने करुन दाखवले

पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडियाचा विंडिजवर ५ विकेट्सने विजय

 

You might also like