भावनगर। महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सध्या सुरु असलेल्या युटीटी राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत (मध्य विभाग) एक सुवर्णपदक व दोन कांस्यपदकांची कमाई करत चमक दाखवली. एसएजी क्रीडा संकुल येथे स्पर्धा सुरु आहे.
मुलींच्या सब ज्युनियर गटात पृथा वर्थीकरने हरयाणाच्या सुहाना सैनीला नमवित सुवर्णपदकाची कमाई केली. पृथाने आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवत सुहानावर 4-3 (11-8, 11-9, 3-11, 3-11, 11-4, 5-11, 11-9) असा विजय मिळवला. त्यापुर्वी झालेल्या उपांत्यसामन्यात तिने तमिळनाडूच्या काव्याश्री भास्करला 4-3 (11-4, 11-5, 11-13, 10-12, 11-8, 8-11, 11-8) असे पराभूत केले.
मुलांच्या ज्युनियर गटात चिन्मया सोमौउआला मिझोरमच्या जेहो हिम्नाकुल्हपुईंघेताकडून उपांत्यफेरीत 2-4 असे पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने सुरुवातीचे गेम जिंकून देखील पराभवाला सामोरे जावे लागले. मिझोरमच्या खेळाडूकडून तो 2-4 (13-11, 12-10, 8-11, 6-11, 2-11, 9-11) असा पराभूत झाला. त्यापुर्वीच्या फेरीत त्याने दिल्लीच्या यशांश मलिकला 4-0 (11-5, 11-6, 11-9, 11-3) असे नमविले होते.
दरम्यान, मुलींच्या कॅडेट गटात जेनिफर वर्गिसला तमिळनाडूच्या शर्वणी नगमकडून 2-3 (10-12, 5-11, 11-9, 12-10, 10-12) असे चुरशीच्या लढतीत पराभूत झाल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.