ठाणे । युटीटी राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस अजिंक्यपद (पश्चिम विभाग) स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमक दाखवत आणखीन पाच पदके मिळवली.युवा जेनिफर वर्गीसने एक सुवर्णपदक मिळवले तर, इतर खेळाडूंनी एक रौप्यपदक व तीन कांस्यपदक मिळवल्याने राज्याच्या खात्यात आता एकूण 11 पदके झाली आहेत.
भारताची तिस-या मानांकित (कॅडेट) तमिळनाडूच्या नगम शर्वणी समोर कॅडेट मुलींच्या अंतिम सामन्यात जेनिफरचे आव्हान होते. जेनिफरने चुरशीच्या लढतीत 4-3 ( 10-12, 11-5, 8-11, 11-8, 11-7, 3-11, 11-9) असे नमवित जेतेपदावर नाव कोरले. त्यापुर्वी तिने तमिळनाडूच्या हंसिनी एम.ला 3-2 (2-11, 11-7, 11-8, 10-12, 11-4) असे नमविले होते.
हृदय देशपांडेने मुलांच्या कॅडेट गटाच्या उपांत्यफेरीत पीएसपीबीच्या दिव्याज रॉय राजखोवाकडून 1-3 (9-11, 4-11, 11-9, 4-11) पराभूत झाल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.त्यापुर्वी त्याने अर्णव झगडेला 3-1 (8-11, 11-8, 11-7,11-9) असे पराभूत करत उपांत्यफेरी गाठली.
मुलांच्या सब ज्युनियर गटात भारताचा सहाव्या मानांकित (सब ज्युनियर) आदील आनंदला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.त्याला तमिळनाडूच्या राज प्रेयेश सुरेशकडून 0-4 (4-11, 9-11, 8-11, 6-11) असे पराभूत व्हावे लागले.
उपांत्यपुर्व फेरीत आदीलने तमिळनाडूच्या थरुन शानमुगमला 4-0 (11-5, 11-8, 11-6, 1-7) असे पराभूत केले. मुलींच्या सब ज्युनियर गटात तनिषा कोटेचा व पृथा वर्तीकर यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांना उपांत्यफेरीत अनुक्रमे दिल्लीच्या नारंग लक्षिताकडून 0-4 आणि सुहाना सैनाकडून 1-4 असे पराभूत व्हावे लागले.