fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

महाराष्ट्रीय मंडळ आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत जुई, अरिजितला विजेतेपद

पुणे । जुई जाधव, अरिजित गुंड, सिमरन धिंग्रा, वरुण गंगवार, अर्णव लुणावत, मृणाल सोनार, आदित्य त्रिपाठी, अनन्या देशपांडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून महाराष्ट्रीय मंडळ आयोजित हौशी खेळाडूंसाठीच्या बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या गटातील विजेतेपद पटकावले.

जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमी व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील केळकर-भोपटकर हॉलमध्ये सुरू होती.

या स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत जुई जाधव हिने ध्रीती जोशीवर १५-९, १५-१० अशी मात करून विजेतेपद पटकावले. यानंतर ११ वर्षांखालील मुलांच्या गटात वरुण गंगवारने केविन पटेलवर १५-९, १५-११ अशी मात केली आणि जेतेपद मिळवले.

स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत आदित्य त्रिपाठीने समर्थ साठेवर १५-७, १५-११ असा विजय मिळवला. १३ वर्षांखालील मुलींच्या गटात मृणाल सोनारने रिधिमा सहरावतचे आव्हान १५-१२, १५-१३ असे परतवून लावले.

१५ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत अरिजित गुंडने निनाद कुलकर्णीवर १५-११, १५-१० अशी मात करून बाजी मारली. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात सिमरन धिंग्राने रक्षा पंचांगवर १५-६, १५-११ अशी मात करून स्पर्धेचे जेतेपद पटकावले. १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अनन्या देशपांडेने सिमरन धिंग्रावर १५-११, ८-१५, १७-१५ विजय मिळवला आणि जेतेपद मिळवले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अर्णव लुणावतने अरिजित गुंडचा १५-११, १५-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

मिश्र दुहेरीत अथर्व घाणेकर-मधुरा पटवर्धन जोडीने सचिन मानकर-राधिनी भामरे जोडीवर १५-१०, ८-१५, १५-१३ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून जेतेपद पटकावले. ४० वर्षांवरील पुरुष दुहेरीत रामकृष्ण पी.- डॉ. एसकेएस ठाकूर जोडीने विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत रामकृष्ण-ठाकूर जोडीने संजीव कुलकर्णी-हसप्रितसिंग सहानी जोडीवर १५-६, १५-१२ अशी मात केली.

महिला दुहेरीत मधुरा पटवर्धनने ईशा सोनसाळेसह बाजी मारली आणि दुहेरी मुकुट पटकावला. अंतिम फेरीत मधुरा-ईशा जोडीने नायब खत्री-तपस्या लांडगे जोडीवर १५-१३, १५-१२ अशी मात केली. पुरुष दुहेरीत तुषार बालपुरे-सचिन मानकर जोडीने अक्षय दाते-निनाद द्रविड जोडीवर १५-१७, १५-११, १५-१३ अशी मात करून विजेतेपद पटकावले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, नीलकंठ कुलकर्णी, हेमंत कानिटकर, इंद्रायणी देवधर, अजित देशपांडे, माधुरी गांगुर्डे, महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले आदी उपस्थित होते.

You might also like